नवी मुंबई : बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधात बंडाचे निशाण फडकविणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही बंडखोरावर तसेच त्यांना साथ देणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षाने कोणतीही कारवाई केली नसल्याने या बंडाला ठाण्याची साथ आहे का, थेट चर्चा आता भाजप वर्तुळात सुरु झाली आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांना साथ द्या असे आवाहन करत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी सायंकाळी उशीरा येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ‘मी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे’ असेही म्हस्के म्हणाले. बेलापूरसाठी मुख्यमंत्र्यांचा संदेश कार्यकर्त्यांपर्यत पोहचविला जात असताना ऐरोलीविषयी मात्र पक्षनेत्यांनी मौन धारण केल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
हेही वाचा – पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते
बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्या विरोधात शिंदेसेनेचे विजय नहाटा यांनी बंडखोरी केली आहे. शिंदेसेनेतील बहुसंख्य कार्यकर्त्यांना यापूर्वीही नहाटा यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे पक्षाचे ठराविक पदाधिकारी आणि काही महत्वाचे कार्यकर्ते नहाटा यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. नहाटा यांना मदत केल्यास मंदा म्हात्रे यांना धोका होऊ शकतो असा मतप्रवाह शिंदेसेनेतील नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेलापुरात जातीने लक्ष घातले असून काहीही झाले तरी म्हात्रे यांनाच मदत झाली पाहीजे असा संदेश स्थानिक नेत्यांपर्यंत पोहचविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचनेनंतरही पक्षातील एक मोठा गट नहाटा यांना मदत करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी उशीरा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन वाशीत आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात म्हस्के यांनी ‘बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांचेच काम करावे लागेल’ अशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. ‘आपल्या कार्यकर्त्यांनी आत्मसन्मानाची अपेक्षा बाळगायला हवीच. मात्र मुख्यमंत्र्यांसाठी महायुतीच्या उमेदवारालाच मदत करा’ असा संदेश म्हस्के यांनी देण्याचा प्रयत्न केला.
ऐरोलीतील बंडाविषयी मौन
बेलापूरमधील कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात संदेश दिला जात असताना ऐरोलीविषयी मात्र म्हस्के तसेच उपस्थित नेत्यांनी मौन बाळगणेच पसंत केले. ऐरोलीत कोणती भूमीका घ्यायची असा सवाल या मतदारसंघातील महिला संघटक शितल कचरे यांनी उपस्थित केला खरा मात्र त्यांना ही बैठक बेलापूरची आहे असे सांगून गप्प बसविण्यात आले. दरम्यान बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील बंडखोरांवर पक्षाने अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. कल्याण पूर्वमध्ये पक्षाचे बंडखोर महेश गायकवाड यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. तसेच मुरबाड, मिरा-भाईदर, डोंबिवली यासारख्या मतदारसंघातही प्रमुख पदाधिकाऱ्यांना तंबी दिली जात आहे. असे असताना बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघातील दोन्ही बंडखोरांची पदे अजूनही शाबूत असल्याचे पहायला मिळत आहे. शिंदेसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असलेले विजय चौगुले यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. महायुतीचे या भागातील उमेदवार गणेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेसेनेचा एकही प्रमुख नेता ऐरोलीत फिरकला नाही. चौगुले यांच्यासोबत शिंदेसेनेचे सर्व माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहेत. असे असताना ऐरोलीतील बंड शमविण्यासाठी ठाण्याहून फारसे प्रयत्न होत नसल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.
हेही वाचा – अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान
ऐरोली विधानसभा क्षेत्रात गणेश नाईक यांनी सुरुवातीपासून एकला चालोरेची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी विश्वासात घेतलेले नाही. पक्ष नेत्यांना आम्ही आमची भूमीका सांगितली आहे. येथील उमेदवार जर महायुतीचा धर्म पाळत नसतील तर आमच्याकडून ही अपेक्षा करणे कितपत योग्य आहे ? – पदाधिकारी, शिंदेसेना ऐरोली