Amravati Maharashtra Assembly Election 2024 : जिल्‍ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमधील लढतींचे चित्र स्‍पष्‍ट झाले असून बहुतांश ठिकाणी तिरंगी सामना आहे. दोन ठिकाणी महायुतीचे उमेदवार समोरा-समोर आल्‍याने उडालेला गोंधळ, सहा मतदारसंघांमध्‍ये महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरी यामुळे या लढती अटीतटीच्‍या बनल्‍या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावतीत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) सुलभा खोडके, काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख आणि भाजपचे बंडखोर जगदीश गुप्‍ता यांच्‍यात मुख्‍य लढत आहे. मनसेचे पप्‍पू पाटील किती झेप घेतात, याचीही उत्‍सुकता आहे. या ठिकाणी अल्‍पसंख्‍यांक आणि कुणबी-मराठा मतांचा प्रवाह निर्णायक मानला जात आहे.

बडनेरात युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्‍या विरोधात सर्व जण एकवटले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सुनील खराटे यांच्‍यासह भाजपचे बंडखोर तुषार भारतीय, शिवसेना ठाकरे गटाच्‍या बंडखोर प्रीती बंड, अपक्ष नितीन कदम यांनी रवी राणा यांना लक्ष्‍य केले आहे. ओबीसी मते या मतदारसंघात आजवर प्रभावी ठरत आली आहेत.

अचलपुरात प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू, काँग्रेसचे बबलू देशमुख आणि भाजपचे प्रवीण तायडे यांच्‍यात तिरंगी सामना आहे. भाजपचे बंडखोर ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल यांनी हिंदुत्‍वाचा झेंडा हाती घेतला असताना जातीय मतविभागणी कशा पद्धतीने होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुस्‍लीम, कुणबी आणि माळी समाजाचे या ठिकाणी प्रभुत्‍व आहे.

हे ही वाचा… Rebellion in Maha Vikas Aghadi Gadchiroli: बंडखोरीमुळे तिन्ही जागांवर महाविकास आघाडीची कोंडी, तर अहेरीत महायुतीपुढे आव्हान?

दर्यापुरातही तिरंगी लढतीचे चित्र आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे गजानन लवटे हे रिंगणात आहेत. भाजपचे माजी आमदार आणि युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांचे उपद्रवमूल्‍य महायुतीसाठी अडचणीचे बनले आहे. या ठिकाणी बौद्ध समाजाच्‍या मते कुणाकडे वळतात, याची उत्‍सुकता आहे.

धामणगाव रेल्‍वे मतदारसंघात भाजपचे प्रताप अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्‍यात पुन्‍हा लढत होत आहे. गेल्‍या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी १२ टक्‍के मते मिळवून काँग्रेसला धक्‍का दिला होता. यावेळीही वंचित आघाडीचे नीलेश विश्‍वकर्मा मैदानात आहेत. कुणबी आणि तेली समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.

हे ही वाचा… Maha Vikas Aghadi in Raigad: रायगडमध्ये चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर

मेळघाटमध्‍ये प्रहारचे राजकुमार पटेल, भाजपचे केवलराम काळे आणि काँग्रेसचे डॉ. हेमंत चिमोटे यांच्‍यात सामना आहे. भाजपमध्‍ये बंडखोरी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी भाजपला मिळालेले मताधिक्‍य ही जमेची बाजू असताना राजकुमार पटेल यांच्‍यासाठी ही लढाई प्रतिष्‍ठेची तर काँग्रेससाठी अस्तित्‍वाची बनली आहे.

मोर्शीत राष्‍ट्रवादीचे (अजित पवार) देवेंद्र भुयार आणि भाजपचे उमेश यावलकर हे समोरा-समोर आहेत. राष्‍ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे गिरीश कराळे यांच्‍याविरोधात काँग्रेसचे बंडखोर विक्रम ठाकरे मैदानात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मतविभागणी रोखण्‍याचे आव्‍हान आहे. कुणबी, माळी आणि मुस्‍लीम मते निर्णायक आहेत.

तिवसामध्‍ये काँग्रेसच्‍या यशोमती ठाकूर यांच्‍या विरोधात भाजपचे राजेश वानखडे मैदानात आहेत. यशोमती ठाकूर यांच्‍यासाठी ही लढत अत्‍यंत महत्‍वाची आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 amravati district mahayuti maha vikas aghadi rebellion clash of old and new candidates print politics news asj