Arjuni Morgaon Vidhan Sabha Election 2024 : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघांत बहुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहे. महायुतीसमोर बंडखोरांचे, तर महाविकास आघाडीपुढे नाराजांचे आव्हान असणार आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच थेट लढत होईल, असे सुरुवातीला दिसून येत होते. मात्र, जागावाटपानंतर हे चित्र पालटले. महायुतीत बंडखोरी झाली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्यासमोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील बंडखोरांचे आव्हान असणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना पक्षाकडून उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांनी त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. भाजप नेते, माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आयात केले आणि उमेदवारीही दिली. यामुळे चंद्रिकापुरे यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली. काट्याने काटा काढण्याच्या उद्देशाने चंद्रिकापुरे यांनी इतर मोठ्या पक्षांकडून तिकीट मिळावी, यासाठी बराच आटापिटा केला. मात्र, गणिते जुळली नाहीत. शेवटी त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातून त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांना उमेदवारी मिळवून दिली. गेल्या पाच वर्षांपासून जनसंपर्क सुरू असल्याने आता सुगत यांची बाजू भक्कम आहे. दुसरीकडे, भाजपला सातत्याने या मतदारसंघातून डावलले जात असल्याने आणि भाजपचे अस्तित्व मतदारसंघातून संपू नये, या उद्देशाने जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप दहिवले यांनी बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. मित्रपक्षांतील दोन बंडखोरांनी दंड थोपाटल्यामुळे बडोले यांच्यासह महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
महाविकास आघाडीने येथे तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली आहे. ते बाहेरचे उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीतही अंतर्गत धुसफूस आहे. बनसोड यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली. पक्षश्रेष्ठींनी नाराजांची समजूत घातली असली तरी ‘पार्सल उमेदवार’ या मुद्याने जोर पकडल्यास बनसोड आणि महाविकास आघाडीलाही फटका बसण्याची शक्यता आहे.