छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात महायुतीत एकमेव मैत्रीपूर्ण लढत आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघात होत आहे. भाजपचे माजी आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बाळासाहेब आजबे यांना त्यांच्या पक्षाने अधिकृत ए. बी. फॉर्म दिल्याने दोघेही मैदानात असून, भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
या मतदारसंघात पंकजा मुंडे दसरा मेळावा घेत असलेले सावरगाव घाट (ता. पाटोदा) हे संत भगवान बाबांचे मूळ गाव आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मातोरी (ता. शिरूर) गावही येत असून, मराठा व वंजारी समाजाची जवळपास सारखीच संख्या असल्याने येथे होणारी लढत लक्षवेधी ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा बराचसा परिणाम अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वत्रच दिसून आल्याचे मानले जात असले तरी या मतदारसंघाने भाजप नेत्या, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना येथून जवळपास ३२ हजारांचे मताधिक्य दिले होते. मराठा व वंजारी समाज प्रत्येकी ३३ ते ३५ टक्के म्हणजे जवळपास सारख्याच संख्येने असलेल्या मतदारसंघात उर्वरित संख्येत माळी, धनगर, दलित व इतर घटकांसह मुस्लीम समुदाय मानला जातो.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार असलेला हा मतदारसंघ भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यासाठी सोडवून घेण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. अखेर त्यांना मतदारसंघ सोडवून घेण्यात काही प्रमाणात यश आले असून, अजित पवार गटानेही दावा सोडला नसल्याने धस यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मकच आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यामान आमदार बाळासाहेब आजबे यांनीही अस्तित्वाची लढाई समजून सर्वस्व पणाला लावले होते. अखेर त्यांनाही पक्षाने ए. बी. फॉर्म देऊन महायुतीने मराठवाड्यातील ही एकमेव मैत्रीपूर्ण ठरवली. त्यातच भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात तुल्यबळ
निर्णायक मुद्दे
● मराठा व ओबीसी मतांमधील विभागणी हाच या मतदारसंघातील निर्णयकी मुद्दा असल्याने तो दोन्ही बाजूने दुभंग आहे.
लोकसभेतील राजकीय चित्र
● महायुती : १,४५,२१० ● महाविकास आघाडी : १,१२,९८८