छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केलेले बीडमधील ज्येष्ठ नेते, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतल्याने त्यांच्याभोवती निर्माण झालेले मळभ दूर झाले. जयदत्त क्षीरसागर यांनी राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे संकेत दिले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार अर्थात त्यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मागे शक्ती उभे करत असल्याचे स्पष्ट करून त्यांनी दुसरे पुतणे तथा महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर यांच्यापुढे आव्हान उभे केले. २०१९ च्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा अवघ्या एक हजार आठशे मतांनी पराभव केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर व महायुतीचे डॉ. योगेश क्षीरसागर ही क्षीरसागर घराण्यातील दोन चुलत भावंडे परस्परांविरोधात लढत आहेत. या दोघांचे काका असलेले जयदत्त क्षीरसागर यांनीही सुरुवातीला अर्ज दाखल केल्याने क्षीरसागर घराण्यातीलच तिघे निवडणुकीच्या मैदानात असल्याचे चित्र होते. परंतु अखेरच्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यांनी अनपेक्षितपणे अर्ज मागे घेतला. त्यांच्या अर्ज मागे घेण्यामागच्या भूमिकेचे अनेक अन्वयार्थ लावले जात होते. जयदत्त क्षीरसागर यांनी एकप्रकारे राजकारणातूनच निवृत्ती घेतली, त्यांचा प्रभाव ओसरला, आता ते सक्रीय राजकारणापासून दूर राहतील, त्यांच्या घराण्यातील नवी पिढीच राजकारणात दिसेल, असे बरेचसे अर्थ काढले जात होते. परंतु मंगळवारच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, खोड अजून मजबूत आहे, स्व. काकूंच्या संस्कारात वाढलेलो असून, खंद्या समर्थक कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी काळातील जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका लढवायच्या असल्याचे सांगत राजकारणात आपण सक्रीय राहणार असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी स्वत:च स्पष्ट केले.

हेही वाचा…वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याची स्थानिक राजकारणात बरीच चर्चा रंगली होती. त्यांना महायुतीतील एका बड्या नेत्याचा फोन आल्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. तेव्हाच जयदत्त क्षीरसागर महायुतीच्या बाजूने अखेरच्या क्षणी प्रचाराची दिशा स्पष्ट करतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मंगळवारी घेतलेल्या मेळाव्यात डाॅ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मांडल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकारणाबाबतचे मळभ दूर झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 beed constituency jayadutt kshirsagar withdrew candidacy fight between yogesh kshirsagar sandeep kshirsagar print politics news sud 02