नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्यास एकच दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. त्यात नागपूर मध्यमधून प्रवीण दटके, पश्चिम नागपूरमधून माजी आमदार सुधाकर कोहळे, उत्तर नागपूरमधून माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांना तर काटोलमधून चरणसिंह ठाकूर व सावनेरमधून आशीष देशमुख यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

मध्य नागपूरच्या जागेबाबत भाजपमध्ये तिढा होता. तेथे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्या ऐवजी विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दटके यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. हलबा समाजालाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह पक्षातून होता, तो झुगारून पक्षाने दटके यांना संधी दिली आहे. त्यांची लढत काँग्रेसचे बंटी शेळके यांच्याशी होणार आहे.

हेही वाचा >>>Yavatmal Vidhan Sabha Constituency: यवतमाळात महाविकास आघाडीत बंडाचे निशाण; माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी भरला उमदेवारी अर्ज

सावनेरमध्ये देशमख

सावनेरमध्ये पुन्हा केदार विरुद्ध देशमुख अशी लढत अटळ आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या येथे काँग्रेसच्या उमेदवार असून भाजपने त्यांच्या विरोधात आशीष देशमुख यांना रिंगणात उतरवले आहे. आशीष देशमुख या मतदारसंघातून यावेळी दोन वेळा पराभूत झाले आहेत. त्यांची काटोलमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण पक्षाने त्यांना सावनेरमध्ये पाठवले.

काटोलमध्ये पुन्हा ठाकूर

काटोल मतदारसंघात मागील निवडणुकीत पराभूत झालेले चरणसिंह ठाकूर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार)चे नेते अनिल देशमुख यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. देशमुख विरुद्ध ठाकूर अशी लढत मागच्या वेळीही झाली होती व ठाकूर त्यात पराभूत झाले होते. यंदा अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढवणार असे जाहीर करण्यात आले पण त्यांनी अर्ज भरला नाही.

हेही वाचा >>>Warora Vidhan Sabha Constituency: वरोऱ्यात काँग्रेस, भाजपमध्ये बंडाचे वारे

दक्षिणचे कोहळे पश्चिममध्ये

दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना यावेळी पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. येथे काँग्रेसचे विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहे. कुणबी बहुल असलेल्या या मतदारसंघात भाजपने कोहळेंच्या रुपात कुणबी कार्ड वापरले आहे.

उत्तरमध्ये मानेंना पुन्हा संधी

उत्तर नागपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात या मतदारसंघाचे माजी आमदार मिलिंद माने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप येथे नवा चेहरा देणार अशी चर्चा होती, अनेक नावेही पुढे आली होती. अखेर पक्षाने मानेंवर विश्वास व्यक्त केला.