नागपूर : गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपुरात यंदा पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची लढत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दुनेश्वर पेठे, अजित पवार गटाच्या बंडखोर आभा पांडे, काँग्रेसचे बंडखोर पुरुषोत्तम हजारे निवडणूक लढवत आहेत. बंडखोरांच्या मतांच्या आधारेच येथील निकालाचे समीकरण ठरेल, असे चित्र आहे.
कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघाला खोपडे यांनी २००९ मध्ये काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांना पराभूत करून या मतदारसंघाला सुरुंग लावला व त्यानंतर सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून येत हॅट्ट्रिक केली. वेळी भाजपने नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी होती. मात्र पक्षाने खोपडे यांनाच परत संधी दिली. दुसरीकडे हा मतदारसंघ काँग्रेसचा असताना अखेरच्या क्षणी येथून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेले गेल्यावेळचे काँग्रेस उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी केली. दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी खोपडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली. त्यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेषत: व्यापारी आणि हिंदी भाषिक वर्गावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातून १७ उमेदवार रिंगणात आहेत.
हेही वाचा >>>खोटे कथानक निवडणुकीत चालणार नाही!
मतदारसंघात अनेक भागात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. पुरुषोत्तम हजारे यांचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. गेल्यावर्षी त्यांनी ७९ हजार ९७५ हजार मते घेतली होती. काँग्रेसचे अनेक कार्यकर्तेदेखील त्यांच्या संपर्कात आहेत, तर दुसरीकडे आभा पांडे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून प्रचाराला लागल्या असून, त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. खोपडे यांच्याविरोधात अनेक ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधातील नाराजीचे चित्र आहे.
२०१४ व २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वांत जास्त मताधिक्य पूर्व नागपुरातून मिळाले. २०२४ मध्येदेखील गडकरी यांना येथूनच सर्वात जास्त ७३ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता कृष्णा खोपडे यांच्यासमोर तो प्रभाव टिकवण्याचे आव्हान असले तरी बंडखोरावर त्यांच्या मतांचे गणित ठरणार आहे.
मतदारसंघातील प्रमुख मुद्दे
मतदारसंघात विविध प्रकल्प सुरू करण्यात आले असले तरी स्मार्ट सिटी प्रकल्प आणि भांडेवाडी हा प्रकल्प विरोधकांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. पूर्व मतदारसंघात विविध आर्थिक स्तराचे मतदार असून, जातीय समीकरणांमध्येही वैविध्य आहे. स्मार्ट सिटीचा मतदारसंघ अशी ओळख असली तरी पूर्व नागपुरात मूलभूत समस्या कायम आहेत. विरोधकांकडून या मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, असुविधांची बजबजपुरी, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी, स्मार्टसिटीच्या आड स्थानिकांची पिळवणूक, तेथील भूमाफिया, खंडणीचे प्रकार इत्यादी मुद्दे आहेत. खोपडे यांच्या प्रचाराचा भर मतदारसंघातील विकासकामे व विविध योजनांचा झोपडपट्टीतील लोकांना दिलेला लाभ यावर आहे.
हेही वाचा >>>भाजपला आता रामाचा विसर, सुप्रिया सुळे यांचा ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात टोला
वंचित, बसपा रिंगणात
या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून गणेश हरकंडे व बहुजन समाजाने मुकेश मेश्राम उमेदवार आहेत. वंचित व बसपाला लोकसभेत फारशी कमाल दाखवता आली नसली तरी अनेक वस्त्यांमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पांडे, हजारे यांच्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील मतांचे काही प्रमाणात विभाजन निश्चितपणे होण्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
विधानसभा २०१९
कृष्णा खोपडे : भाजप – १,०३,९९२
पुरुषोत्तम हजारे : काँग्रेस – ७९,९७५
लोकसभेतील मते (२०२४)
महायुती – १,४१,३१३
महाविकास आघाडी : ६७,९४२