वर्धा : आर्वी मतदारसंघातील भाजपमधील स्पर्धा शिगेला पोहचली आहे. पक्षाने तिकिट दिलेले उमेदवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनी एबीफॉर्मसह अर्ज दाखल करीत प्रचारात वेग घेतला आहे. तर दुसरीकडे तिकिट कापण्यात आलेले विद्यमान आमदार दादाराव केचे हे अर्ज परत घेण्यास अजिबात तयार नसून मी अपक्ष लढणारचा घोषा त्यांनी लावला आहे.
अर्ज परत घेण्यास अद्याप दोन दिवस बाकी आहे. त्यामुळे केचे यांनी अर्ज परत घ्यावा यासाठी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून जोमाने प्रयत्न सुरू आहे. एका आकस्मिक घडामोडीत दादाराव केचे हे आर्वीतून ‘गायब’ झाल्याची चर्चा उसळली. ते दिल्लीत गेल्याचे म्हटल्या जाते. मात्र अनेक प्रयत्नानंतर त्यांच्याशी संपर्क झाल्यावर ते केचे म्हणाले की मी दिल्लीत नसून अहमदाबादला आहे. काही मंडळी माझ्यासोबत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पण ईथेच आहे. आर्वीचे माझे एक दोन सहकारी सोबत असल्याचे नमूद करीत केचे यांनी त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. केचेंची समजूत घालण्याची ही सर्वात मोठी घडामोड ठरत आहे.
आणखी वाचा-भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….
यापूर्वी सात दिवस आधी केचेंशी भाजप वरिष्ठांची चर्चा झाली होती. वर्ध्यातून माजी खासदार रामदास तडस हे केचेंना घेवून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे पोहचले होते. त्या बैठकीत सुधीर दिवे, अनिल जोशी व केचे यांचे एक सहकारी होते. बैठकीत केचे यांना डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणूकीत आमदार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. भाजपतर्फे पहिले नाव त्यांचेच राहिल व ही हमी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यापुढे प्रसंगी वदवून घेतल्या जाईल, असे बैठकीत केचेंना सांगण्यात आले. यानंतर प्रतिक्रिया देतांना दिवे म्हणाले होते की दादाराव अर्ज भरतील पण पक्षाचाही निर्णय मान्य करतील. त्यानंतर दोनच दिवसांनी वाजतगाजत व शेकडोंच्या उपस्थितीत अर्ज सादर केला.
ब्रम्हदेव जरी आला, तरी मी अर्ज मागे घेणार नाही, अशी गर्जना केचेंनी जाहीरपणे केली. त्यामुळे भाजप वर्तुळात भुकंपच झाला. अर्ज दाखल केल्यानंतर केचे कन्नमवार ग्राम व अन्य गावांची नावे जाहीर करीत प्रचार करू लागले. त्यामुळे आर्वीत बंडखोरी अटळ व त्याचा फायदा कॉग्रेस उमेदवारास होणार, असे बोलल्या जावू लागले. पण ही बंडखोरी शांत करायचीच असा निर्धार भाजप वर्तुळात दिसून आला. आता दिवाळीचे फटाके फुटत नाही तोच पक्षीय राजकारणाचे अनार उडाले आहे. केचेंना येनकेन प्रकारे अर्ज मागे घेण्यास भाग पाडायचेच, असा पवित्रा त्यांना आर्वीतून बाहेर काढत पक्षश्रेष्ठींने घेतल्याचे म्हटल्या जात आहे.