सांगली : महायुतीअंतर्गत भाजपमधील शिराळा मतदार संघातील बंडोबा थंड करण्यात भाजप नेत्यांना यश आले. शिराळ्यात भाजपचे सम्राट महाडिक यांनी अधिकृत उमेदवार सत्यजित देशमुखांना पाठिंबा दिला यामुळे भाजपचे सत्यजित देशमुख विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे.
भाजपकडून देशमुख आणि महाडिक यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. पक्षाने महाडिक यांना डावलल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. गेल्या वेळीही त्यांनी भाजपकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. मात्र गेल्या निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांना पक्षाने उमेदवारी दिली. यावेळी तालुक्यातील सर्वच राजकीय समिकरणे बदलली आहेत. माजी मंत्री नाईक यांनी भाजपचा त्याग करीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यामुळे मतदार संघामध्ये आता चिखलीचे नाईक घराणे एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. यामुळे ही ताकद वाढली असल्याचे दिसत असले तरी देशमुख आणि महाडिक गटाची ताकदीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण देशमुख गटातील शिवाजीराव देशमुख यांनी आमदार, मंत्री, विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम केले असल्याने त्यांच्याही गटाची ताकद आहे. यामुळे जिल्ह्यात या मतदार संघात आता तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत आहेत.
आणखी वाचा-बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार
गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष मैदानात उतरलेल्या महाडिक यांनी ४५ हजार मतांचा टप्पा गाठला होता. यामुळे वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा या मतदार संघात असलेला समावेशही निर्णायक ठरणारा आहे. या ४८ गावामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे.तसेच त्यांचे मूळ गाव कासेगावही शिराळा मतदार संघात आहे. यामुळे या गावांचा कल कुणाकडे जाईल याचा मतदार संघाच्या निकालावर परिणाम करणारा ठरणार आहे.
शिराळा तालुक्यात चिखलीतील नाईक घराण्यातील शिवाजीराव व मानसिंगराव नाईक यांच्यात आतापर्यंतचा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला. कोकरूडच्या देशमुख गटाचे नेतृत्व सध्या सत्यजित देशमुख यांच्याकडे आहे. हा देशमुख गट कोणाच्या बाजूला जातो त्यांचा विजय हमखास मानला जात असला तरी बदलत्या काळात देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे दोन्ही नाईक गटात एकी झाल्याचे दिसत असले तरी महाडिक यांच्या गटाची ताकदही गेल्या काही वर्षात वाढली आहे. गत निवडणुकीत या मतदार संघामध्ये तिरंगी लढत झाली होती. भाजपचे शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आणि अपक्ष सम्राट महाडिक अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत मानसिंगराव नाईक हे विजयी झाले असले तरी महाडिक यांच्या बंडखोरीचा फटका शिवाजीराव नाईक यांना बसला महाडिक यांना ४६ हजार २३९ मते मिळाली, तर विजेत्या मानसिंगराव नाईक यांना १ लाख १ हजार ९३३ आणि शिवाजीराव नाईक यांना ७६ हजार मते मिळाली.
आणखी वाचा-अमरावती जिल्ह्यात जुन्या-नव्या चेहऱ्यांचा संघर्ष!
दोन्ही नाईकांच्यात समझोता झाला असून दोन्ही नेते सातत्याने एका व्यासपीठावर आहेत. गावपातळीवर एकत्र असल्याचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. मात्र, यावेळी देशमुख आणि महाडिक यांचे गट भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. सध्या देशमुखांच्या पाठीशी महाडिक गटाची ताकद उभी राहिली असली तरी पडद्याआड काय शिजते हे निवडणुकीच्या रणांगणावेळीच लक्षात येणार आहे. देशमुखांची कधीकाळी आमदार नाईक यांच्याशी असलेली जवळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी असलेले नातेसंबंध यावेळी राजकीय डावपेचात कशी भूमिका बजावतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. सत्यजित देशमुख हे आमदार पाटील यांचे साडू आहेत. यामुळे सत्तेच्या सारीपाटावर चिखलीचे नाईक घराणे विरूध्द देशमुख-महाडिक यांची युती कोण सरस ठरते हे निवडणुक निकालातून दिसणार आहे.
तालुक्यातील वाकुर्डे योजना, नदीकाठी अतिपावसाने सातत्याने होत असलेले नुकसान, वन जमिनीचा प्रश्न, धरणग्रस्तांचे प्रश्न हे प्रश्न तर दुसर्या पिढीसमोरही कायम आहेत. या प्रश्नांची सोडवणूक कशी आणि कधी होणार हे महत्वाचे तर आहेच, वाकुर्डे सिंचन योजना हा जसा कळीचा मुद्दा आहे तसाच डोंगरी भाग आजही विकासापासून वंचित आहे. चांदोलीच्या खोर्यात आजही रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांची उणिव आहे. या प्रश्नांना कोण हात घालणार? धरणग्रस्तांचे प्रश्न कधी सुटणार या समस्यांच्या विळख्यात अडकलेला हा मतदार संघ कसा कौल देतो हे निवडणुक निकालात दिसणार आहे.