नवी मुंबई : भारतीय जनता पक्षासाठी एरवी सुरक्षीत वाटणारा बेलापूर विधानसभा मतदारसंघ संदीप नाईक यांच्या बंडखोरीमुळे आव्हानात्मक ठरु लागल्याचे लक्षात येताच भाजपच्या रणनितीकारांनी या मतदारसंघात गोवा राज्यातून आलेली आमदारांची अधिकची कुमक तैनात केली असून उमेदवारापेक्षा चिन्हावर भर देत प्रचार आखणीतही मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

२०१४ पासून हा मतदारसंघ भाजपला पोषक मानला जातो. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची पुरेशा प्रमाणात मिळत नसलेली साथ, विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्वभावाविषयी उभे रहात असलेले ‘कथानक’ आणि प्रत्यक्ष प्रचारात कमकुवत ठरत असलेला यंत्रणेचा मुद्दा भाजपच्या गोटात चितेंचा ठरु लागला असून यामुळे अखेरच्या टप्प्यात ‘कमळ’ केंद्रीत प्रचारावर भर दिला जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या प्रचारात चिन्ह कसे केंद्रस्थानी ठरेल याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार होते. म्हस्के यांना बेलापूर मतदारसंघातून १२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य यापेक्षा जास्त होते. पाच वर्षांपुर्वी भाजपच्या मंदा म्हात्रे याच मतदारसंघातून ४३ हजारांपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. असे असताना लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य आणि संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे याठिकाणी सुरु झालेली चुरस यामुळे भाजपच्या रणनितीकारांना हा मतदारसंघात अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.

Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?
Maharashtra Assembly Election 2024,
लातूरमध्ये काँग्रेसकडे वळलेल्या लिंगायत मतपेढीला भाजपची साद
maharashtra assembly election 2024 shrirampur ahmednagar assembly constituency mahayuti ajit pawar ncp vs shivsena shinde group
श्रीरामपुरमध्ये महायुतीतील अंतर्गत बेबनाव उघड
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
union home minister amit shah released bjp manifesto for maharashtra assembly poll 2024
‘राज्याला तंत्रज्ञानाची राजधानी बनवणार’,भाजपकडून वचनांचा पाऊस

आणखी वाचा-महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे

गोव्याची रसद आणि चिन्हाचा प्रचार

भाजपच्या सुरक्षीत मतदारसंघांच्या यादीत बेलापूर हा सुरुवातीला अग्रक्रमावर मानला जात होता. २०१४ नंतर देशात बदललेल्या राजकीय समिकरणात बेलापूरने नेहमीच भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तसा धोका नाही असा दावा भाजपच्या गोटातून केला जात होता. मात्र विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देताच भाजप नेते गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसमधून उमेदवारी घेतली आणि येथील चुरस वाढल्याचे पहायला मिळत आहे. आमदार म्हणून दहा वर्षात मंदा म्हात्रे यांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद फारसा चांगला नव्हता असा प्रचार नाईक समर्थक करताना दिसत आहेत. याशिवाय अनेकांना मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीचा मुद्दा प्रचारात पद्धतशीरपणे आणला जात आहे. आमदार म्हात्रे मित्र पक्षांच्या दूर भाजपच्या कार्यकर्त्यांनाच जुमानत नाहीत हा मुद्दाही त्यांचे विरोधक आक्रमकपणे मांडू लागले असून हे ‘कथानक’ निवडणुकीचा केंद्रस्थानी येत असल्याचे लक्षात येताच भाजपच्या रणनितीकारांनी गेल्या काही दिवसांपासून बेलापूरची निवडणूक हाती घेतल्याचे पहायला मिळत आहे.

आणखी वाचा-वंचितच्या भूमिकेमुळे ‘अकोला पश्चिम’चे समीकरण बदलणार

गोवा राज्यातून भाजपचे बडे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोकसभा क्षेत्रातील विधानसभा परिसरात मोहीमेवर असून बेलापूरवर त्यांनी अधिकचे लक्ष केंद्रीत केल्याचे पक्षातील वरिष्ठ सुत्रांनी सांगितले. गोव्यातील काही आमदारांची कुमक बेलापूरमध्ये तैनात करण्यात आली असून या मतदारसंघातील बदलते ‘कथानक’ लक्षात घेता उमेदवाराऐवजी चिन्हावर भर द्या अशा स्पष्ट सूचना प्रचार यंत्रणांना देण्यात आल्याचे समजते. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात फिरणारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अजून तरी नवी मुंबईत प्रत्यक्ष दौरा केलेला नाही. असे असले तरी शिंदे सेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते म्हात्रे यांच्या कार्यपद्धतीवर फारसे खूश नाहीत. स्थानिक पातळीवरील प्रचारातही सुसूत्रता आणण्याची धडपड सध्या पक्षाकडून सुरु असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुर्ण फळी या भागात ‘कमळ’ घेऊन उतरविण्यात आल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. सुरुवातीला वाटत होता तितका हा मतदारसंघ सोपा राहीला नसल्याची जाणीव आम्हाला झाली असून त्यामुळे याठिकाणी पुर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे वरिष्ठांचे आदेश आले आहेत, असेही या नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.