चंद्रपूर: ही माझी शेवटाची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन मतदारांना करून मागील दहा वर्षांपासून सतत निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कृतीतून आंदोलन न करता प्रेस नोट काढून आंदोलनाचा तेवढा भास निर्माण करणारे व स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांना या निवडणुकीत तरी मतदार स्वीकारणार का ? अशी चर्चा राजुरा मतदारसंघात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी व कुणबी बहुल या जिल्ह्यातील सर्वाधिक सिमेंट उद्योग असलेल्या राजुरा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप दर निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. त्यांची लढत काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष धोटे, भाजप व महायुतीचे देवराव भोंगळे यांच्याशी आहे. ॲड. चटप यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे १९९०, १९९५ व २००४ असे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्याच काळात या भागात सिमेंट उद्योग बहरला, सिमेंट उद्योगांनी या भागातील शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणात अधिग्रहित केली. त्यांच्या जमिनीला योग्य भाव दिला नाही तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबात नोकरी देखील दिली नाही. शेतकऱ्यांचे हे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे ॲड. चटप स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रोजेक्ट करतात. मात्र या गंभीर विषयावर त्यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी कधीच आंदोलन केले नाही. या भागात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संख्येने अधिक आहे. मागील लोकसभा निवडणुकीपासून सोयाबीन व कापसाला भाव देण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र तरीही ॲड. चटप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाची कृती न करता केवळ प्रेस नोट काढून प्रसिद्धीत राहतात.

हेही वाचा – चिपळूण-संगमेश्वरमधील लढतीला निष्ठा विरुद्ध गद्दारी असे स्वरुप

मागील दहा वर्षांपासून त्यांनी या भागातील शेतकरी व मतदरांसोबत भावनिक खेळ सुरू केला आहे. २०१४ पासून ॲड. चटप मतदारांना ही माझी शेवटची निवडणूक आहे असे सांगून भावनिक आवाहन करतात. अशा पद्धतीने त्यांनी दोन लोकसभा व दोन विधानसभा निवडणुका लढल्या. आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीचे भावनिक आवाहन करीत मतदान रुपात शेवटची काडी टाका असे ते मतदारांना सांगत आहेत. स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणविणारे ॲड. चटप २०१९ मध्ये दिल्लीत शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन केले तेव्हा प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी न होता चंद्रपुरात बसून राहिले. मग ॲड. चटप यांना शेतकरी नेता म्हणायचे तरी कसे असाही प्रश्न आता या निमित्तानं मतदारसंघात उपस्थित केला जात आहे.

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी असेपर्यंत या भागात शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांवर असंख्य आंदोलने झाली. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांची सर्व आंदोलने थंडावली आहेत. शरद जोशी यांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांच्या एकाही प्रश्नावर एकही आंदोलन केल्याचे स्मरत नाही. आणि आता हेच ॲड. चटप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मते मागत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून ॲड. चटप यांनी आता मोर्चा स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाकडे वळविला आहे. दरवर्षी विदर्भ राज्य निर्मिती ठरावाच्या प्रती जाळून आंदोलन करणे हा एकमेव उपक्रम राबवित आहेत.

हेही वाचा – खानापूरमध्ये दोन माजी आमदारपुत्रांमधील लढत चुरशीची

२०१९ ची निवडणूक ही मोदी सरकारने केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात लढली गेली तर २०२४ ची लोकसभा निवडणूक ही संविधान या विषयावर लढली गेली. ॲड. चटप स्वतः वकील आहेत. मात्र त्यांनी या निवडणुकीत कोणतीही भूमिका घेतली नाही. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा भावनिक आहे. तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी तुम्ही लढाच, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील आंदोलन करा, शेतकऱ्यांसाठी लढतो असे सांगून दिशाभूल करू नका असे आता या भागातील मतदार म्हणत आहेत.

विशेष म्हणजे ॲड. चटप काँग्रेस हा माझा क्रमांक एकचा शत्रू आहे असे सांगतात. मात्र भाजप विरोधात कोणतीही भूमिका घेत नाही अथवा भाजप माझा मित्र आहे असेही सांगत नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत ॲड. चटप यांनी भाजपचे हंसराज अहिर यांना मदत केली होती. तेव्हा त्यांची युती देखील होती. मात्र लोकसभेच्या मागील दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचे कुणबी समाजाचे उमेदवार धानोरकर यांना मदत केली. त्यामुळे काँग्रेस माझा पहिल्या क्रमांकाचा शत्रू हे कसे काय असाही प्रश्न आता या भागातील मतदार उपस्थित करीत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 chandrapur vidhan sabha constituency farmer issues protest adv vamanrao chatap print politics news ssb