Chandrapur Assembly Constituency Candidates for Maharashtra Assembly Election 2024 चंद्रपूर : राज्याच्या राजकारणात वर्चस्व राखून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजप नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस नेते तथा विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर या तीन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुनगंटीवार यांना सातव्या विजयाची, तर वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीत ‘हॅट्ट्रिक’ची प्रतीक्षा आहे. ‘लाडका भाऊ’ उमेदवार असल्याने खासदार धानोरकर यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर मुनगंटीवार यांना सातव्या विजयाची प्रतीक्षा

जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ असून त्यापैकी बल्लारपूर, ब्रह्मपुरी व वरोरा या तीन मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. बल्लारपूर मतदारसंघात भाजप उमेदवार मुनगंटीवार सलग सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने या निवडणुकीत विजय हवाच, या निर्धाराने ते निवडणूक लढत आहेत. भाजपचे दिग्गज नेते तथा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असल्याने मुनगंटीवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

हेही वाचा >>>मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?

वडेट्टीवार यांना ‘विजय’ आवश्यकच

वडेट्टीवार यांनाही ब्रह्मपुरीतून विजय आवश्यकच आहे. भाजपने वडेट्टीवार यांच्या विरोधात ‘कुणबी कार्ड’ खेळले आहे. येथे कृष्णा सहारे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांना संघर्ष करावा लागत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे वडेट्टीवार यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पक्षातील काही नेते त्यांच्या विरोधात दंड थोपटून आहेत. मात्र त्यावर मात करून विजय पदरी पाडून घेण्याचे आवाहन वडेट्टीवार यांच्यापुढे आहे. याचबरोबर त्यांच्यावर चंद्रपूरमधील प्रवीण पडवेकर आणि बल्लारपूरमधील संतोष सिंह रावत यांनाही निवडून आणण्याचीही जबाबदारी आहे.

हेही वाचा >>>अंधेरी पश्चिमेत भाजप आमदाराला कडवे आव्हान!

धानोरकर यांना कुटुंबातूनच आव्हान

काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ‘लाडके भाऊ’ प्रवीण काकडे हे वरोरा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. खासदार धानोरकर यांचे भासरे वंचितचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी काकडे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. आम्ही निवडून आलो नाही तरी चालेल, मात्र काकडे नकोच, या एकाच उद्देशाने अनिल धानोरकर, मुकेश जीवतोडे आणि डॉ. चेतन खुटेमाटे या धनोजे कुणबी समाजाच्या उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. तसेच मुस्लीम समाजातून प्रहार पक्षाचे एहतेशाम अली हे देखील रिंगणात आहेत. हे सर्व उमेदवार काकडे यांच्या मतांचे विभाजन करतील, असा रागरंग आहे. यामुळे भावाला निवडून आणण्याचे आव्हान खासदार धानोरकर यांच्यापुढे आहे. त्यांनी साम, दाम, दंड, भेद या युक्तींचा वापर करीत स्थानिक पातळीवर सर्वांना कामाला लावले आहे. कुठल्याही स्थितीत लाडक्या भावाला विजयी करायचेच, असा निर्धार खासदार धानोरकर यांनी केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 charndrapur vidhan sabha constituency bjp sudhir mungantiwar vs congress vijay wadettiwar vs pratibha dhanorkar print politics news amy