छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव येथे हाणामारी, आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यास दिलेली धमकी, वैजापूर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार प्रा. रमेश बोरनारे यांच्या गाडीवर दगडफेक, कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी बाचाबाची असे प्रकार वगळता संभाजीनगर जिल्ह्यात शांततेमध्ये मतदान झाले. कन्नड तालुक्यातील रामनगर येथे नागरिकांनी सकाळच्या टप्प्यात स्मशानभूमीच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सकाळच्या टप्प्यात या गावात केवळ चार जणांनी मतदान केले होते. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला आणि मतदानाची टक्केवारी ६५ टक्क्यांपर्यंत जाईल, असे सांगण्यात येत आहे.
सकाळच्या सत्रात शहरातील उमेदवारांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी सकाळी मतदान केले. औरंगाबाद पूर्वचे उमेदवार अतुल सावे, इम्तियाज जलील यांनीही मतदान केले. मतदानानंतर जलील यांनी सावे यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याची तक्रार केली. अनेकांनी मतदान करू नये यासाठीही पैसे वाटप केल्याचा आरोप केला. दुपारी उस्मानपुरा मतदान केंद्राच्या परिसरात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे शहराध्यक्ष नितीन पवार यांना धमकी दिल्याचे छायाचित्रण विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमांवर टाकले. सिल्लोड येथील घटाब्री गावात अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. या गावात उमेदवारांच्या शाळेतील शिक्षक पैसे वाटण्यासाठी आल्याचा संशयावरुन हा वाद पेटला. गावकऱ्यांनी या शिक्षकाला धक्के मारुन बाहेर काढल्याचे छायाचित्रेही पुढे आली.
हेही वाचा : उत्तर महाराष्ट्र : जातीय धार्मिक मुद्द्यांवरच प्रचार केंद्रित
दरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अंबादास दानवे यांनी रात्रभर शिवसेनेकडून पैसे वाटप सुरूच होते. सत्ताधारी आमदारांच्या या कृतीला पोलिसांचेही संरक्षण होते, असेही त्यांनी म्हटले. जिल्ह्यात अन्यत्र मतदान केंद्रावर शांततेमध्ये मतदान सुरू होते. दिवसभर केंद्राबाहेर लांबच लांब रांगा होत्या. विशेषत: मुस्लिम, दलित वस्त्यांमध्ये मोठ्या रांगा दिसून आल्या. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बाजूने आम्हीच विजयी होऊ असा दावा केला जात होता. मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे आता विजयाचे गणित घातले जात आहे. खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मतदान केले. मतदानाचा उत्साह वाढविण्यासाठी अनेक मतदान केंद्रात रांगोळ्या काढल्या होत्या. फुगे लावण्यात आले होते. मतदानात महिलांची संख्या लक्षणीय होती.
हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती
पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
सिल्लोड-७०.४६ टक्के, कन्नड-६२.२० टक्के, फुलंब्री-६१.४९ टक्के, औरंगाबाद मध्य-५३.९८ टक्के, औरंगाबाद पश्चिम-५२.६८ टक्के, औरंगाबाद पूर्व-५५.७६ टक्के, पैठण-६८.५२ टक्के, गंगापूर-६०.५६ टक्के, वैजापूर-६४.२१ टक्के. असे एकूण सरासरी ६०.८३ टक्के मतदान झाले होते.