नागपूर : विधानसभा निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस स्वत:च्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देखील विजयी होणार का, याबाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. फडणवीसांचा त्यांच्या मतदारसंघाशी संपर्क तुटलेला आहे, राज्यातील तोडाफोडीच्या राजकारणामुळे ते स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात होती. मात्र फडणवीस यांनी सर्व चर्चांना केवळ चर्चेपुरते मर्यादित ठेवत दक्षिण-पश्चिमचा गढ ३९ हजार मतांच्या अंतराने जिंकला. फडणवीसांच्या या विजयासाठी घरोघरी जनसंपर्क करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोलाचा हातभार लावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून फडणवीसच याचे प्रतिनिधित्व करत आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये फडणवीस यांच्या विजयाबाबत कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. मात्र २०१९ नंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे फडणवीस उपराजधानीतील त्यांच्या मतदारसंघाला अधिक वेळ देऊ शकले नाही. २०२४ मधील प्रचारादरम्यान फडणवीस यांनी स्वत: या गोष्टीची कबुली दिली होती. यंदाच्या निवडणुकीत फडणवीसांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचार सभांसाठी फिरत असल्याने दक्षिण-पश्चिममध्ये प्रचाराची संपूर्ण धुरा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर होती. कार्यकर्त्यांनीही फडणवीसांसाठी संपूर्ण ताकत झोकत मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी मतदारसंघात केलेल्या विकास कार्याची प्रभागवार माहिती देणारी माहिती पुस्तिका कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचविली. कार्यकर्त्यांच्या या कष्टाचा फायदा फडणवीस यांना मिळालेल्या मतांमधून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, फडणवीसांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल गुडधे पाटील यांनीही पदयात्रेच्या माध्यमातून घरोघरी जात फडणवीसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यात गुडधे पाटील यांना थोडेफार यश आले, मात्र फडणवीसांना मात देण्यासाठी हे पुरेसे नव्हते.

हेही वाचा – महाराष्ट्र नवनिर्माणाचे इंजिन १८ वर्षांनंतरही यार्डातच, विधिमंडळातील अस्तित्वही संपुष्टात

लाडक्या बहिणींचे देवाभाऊ

दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिल्यांदाच महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक होती. मतदानाच्या दिवशीही महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक मतदान केले. लाडकी बहीण योजनेमुळे महिला मोठ्या संख्येत मतदानासाठी आले असल्याचे सांगितले जाते. महिला भाजप कार्यकर्त्यांनीही प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेचा प्रकर्षाने प्रचार करत देवाभाऊंच्या बाजूने मते वळविण्यात मोलाची भूमिका बजावली.

हेही वाचा – वर्धा : पोरक्या काँग्रेसला उमेद देण्याचे काँग्रेस नेत्यांपुढे आव्हान

दलित मतांची विभागणी नाही

दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सुमारे २२ टक्के दलित मतदार आहेत. या मतांची विभागणी बसपचे सुरेंद्र डोंगरे आणि वंचितचे विनय भांगे करतील अशी अपेक्षा केली जात होती. मात्र हे दोघेही मतदारात काहीही प्रभाव दाखवू शकले नाही. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी अडीच हजाराच्या आसपास मते मिळाली. दलित मतदारांची मते भाजप किंवा काँग्रेसच्या पारड्यात गेली. यामुळेच गुडधे पाटील फडणवीसांचे मताधिक्य कमी ठेवण्यात यशस्वी ठरले. या मतदारसंघात नोटा देखील प्रभावी ठरला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 devendra fadnavis nagpur south west constituency won ladki bahin yojana dalit voters print politics news ssb