मुंबई : ‘व्होट जिहाद’ला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जोगेश्वरी (प.) येथील प्रचार सभेत केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मतांसाठी लाचार झाले. आम्ही हार पत्करू, पण कधीही लाचार होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोरेगाव येथील भाजप उमेदवार विद्या ठाकूर आणि वर्सोवा येथील उमेदवार भारती लव्हेकर यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची सभा जोगेश्वरी (प.) येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ म्हटलेले खपवून घेणार नाही. आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही. पण मतांसाठी लांगूलचालन चालू देणार नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडले, हे औंरग्याच्या कबरीवर फुले टाकणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. वक्फ बोर्डाला एक हजार कोटी रुपये, काझींचे वेतन सरकारने द्यावे, मुस्लिमांना १० टक्के आरक्षण आदी उलेमांनी केलेल्या १७ मागण्या देशहिताच्या नाहीत. काँग्रेस, शरद पवार व ठाकरे यांना हे सर्व काही चालत असेल, पण आम्ही सहन करणार नाही. कृष्णाने महाभारतात सांगितल्याप्रमाणे विजय हा सत्याचाच होईल. ही लढाई आम्ही पूर्ण ताकदीने लढू. आता देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मैदानात उतरावे.

हेही वाचा >>> मविआमध्ये धुसफुस सुरूच; प्रचाराला आठवडा बाकी असताना गोंधळाची स्थिती, आघाडीधर्म पाळण्याचा ठाकरेंचा काँग्रेसला इशारा

मराठी माणसाचे नाव घेऊन आपली घरे भरली, त्यांच्यासाठी गेल्या २५ वर्षांत केलेले एखादे काम तरी ठाकरे यांनी सांगावे, असे आव्हान देत फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार होते व त्यांनी मुंबईतील विकासकामे बंद पाडली. पत्रा चाळ पुनर्विकासात भ्रष्टाचार झाला. हा पुनर्विकास आम्ही मार्गी लावला, बंद पडलेल्या प्रकल्पांची कामे महायुती सरकारने मार्गी लावली. झोपडपट्टी पुनर्वसन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक निर्णय व ११ योजना सुरू केल्या. सागरी किनारपट्टी मार्गाचे काम वेगाने होत असून अनेक वर्षे काँग्रेस सरकारने नुकतीच चर्चा केलेल्या अटल सेतूचे काम पूर्णत्वास नेले. मुंबईत पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरू आहेत. काँग्रेस सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात ११ किमी मेट्रोचे काम झाले, तर आमच्या सरकारने पाच वर्षांत ३५४ किमी मेट्रोची कामे सुरू करून सुमारे १०० किमीची कामे वेगाने पूर्ण केली.

कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण

कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण केले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र डीसीआर तयार करण्यात आले. त्यांचे अस्तित्व कायम ठेवले जाईल व कोळीवाड्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 devendra fadnavis remark on vote jihad versova assembly constituency print politics news zws