भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली या तीनही मतदारसंघांत बंडखोरांमुळे अटीतटीचे सामने रंगण्याची चिन्हे आहेत. पक्षातील बंडखोरी, मित्र पक्षांसह स्वपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी तसेच मतदारांमध्ये उमेदवारांप्रती असलेली नकारात्मकता, यामुळे उमेदवारांची प्रचारादरम्यान चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर, महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजा ठवकर तसेच उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यात तिरंगी लढत आहे. शिंदेसेनेचे उमेदवार हे निवडणूक जिंकण्यासाठी अतिमहत्त्वाकांक्षी असून त्यांच्या प्रचाराची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांभाळली, तर काँग्रेसच्या ठवकर यांच्या प्रचारार्थ कन्हैया कुमार यांनी हजेरी लावली. अपक्ष उमेदवार पहाडे यांनी भोंडेकर व ठवकर यांच्यापुढे तुल्यबळ आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा >>>अजित पवारांनी विदर्भातील स्वपक्षाच्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडले का? एकही प्रचार सभा नाही, कार्यकर्ते सैरभैर

साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पराभूत करण्यासाठी महायुतीने घाट घातला. मात्र, महायुतीचा डाव त्यांच्यावरच उलटला आणि पक्षांतर्गत फाटाफूट झाली. आता काँग्रेसचे पटोले, भाजपचे अविनाश ब्राह्मणकर आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर यांच्यात चुरशीची लढत आहे.

तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) चरण वाघमारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राजू कारेमोरे अशी थेट लढत आहे. येथे बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली आहे. धनेंद्र तुरकर, सेवक वाघाये आणि ठाकचंद मुंगुसमारे हे अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीच्या किती मतांचे विभाजन करतात, यावर येथील निकाल अवलंबून असेल. वाघमारे आणि कारेमोरे यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार असून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>Constituencies In Yavatmal : स्थानिक मुद्यांसह जातीय समीकरणे निर्णायक, यवतमाळमधील सातही मतदारसंघात चुरस

भंडारा आणि तुमसर विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदारांबद्दल मतदारांमध्ये नाराजी असून येथे बदलाचे संकेत आहेत, तर साकोलीतील मतदार पुन्हा एकदा पटोले यांना कौल देणार की बदल घडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 due to rebel candidates in bhandara tumsar and sakoli constituencies close fights print politics news amy