विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या ब्रम्हपुरी मतदारसंघासोबत डॉ. सतीश वारजुरकर, बल्लारपूरमध्ये संतोष रावत आणि चंद्रपूर मतदारसंघात प्रवीण पडवेकर यांच्यासाठी प्रचारसभा व बैठका घेतल्या. मात्र, वरोरा व राजुरा मतदारसंघांत जाणे त्यांनी कटाक्षाने टाळले.
आणखी वाचा-सहा निवृत्त अधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध
खासदार प्रतिभा धानोरकर वरोरा व राजुरा मतदारसंघांत सभा, बैठक घेत आहेत. चंद्रपुरात पडवेकर यांच्या एका बैठकीला त्यांनी हजेरी लावली. तसेच स्वतःच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. मात्र, येथे सक्रिय प्रचारापासून त्या दूरच आहेत. बल्लारपूर मतदारसंघात जाण्याचेही त्यांनी टाळले.
चंद्रपूर मतदारसंघात तर शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय., सेवादल या काँग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र आहे. अनेक पदाधिकारी त्यांच्या गटातील उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघांत जात आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे स्वतःच्याच प्रचारात अडकून पडले आहेत.
आणखी वाचा-बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्यासमक्ष जयश्री शेळकेंचे तुल्यबळ आव्हान; कोण बाजी मारणार?
‘प्रचारात सहभागी व्हा’
वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील एक हॉटेलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आपापल्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी व्हा, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी त्यांनी सर्वांना शपथही दिली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पदाधिकारी के.राजू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रचार करा, असे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, पदाधिकारी सक्रिय प्रचारापासून दूरच आहेत. काँग्रेसमधील गटबाजी एवढी खोलवर रुजली आहे की ती संपता संपत नसल्याचेच चित्र आहे.