कर्जत : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी, त्याभोवती फिरणारे राजकारण आणि विद्यामान आमदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ राज्यात चर्चिला जातो. अलीकडच्या काळात मतदारसंघात एमआयडीसी कुठे करायची, याचा दोन आमदारांतील वाद थेट विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचवणारा मतदारसंघ म्हणूनही याची ओळख आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कर्जत-जामखेड मतदारसंघात विद्यामान आमदार रोहित पवार व विधान परिषदेवर पुनर्वसन झालेले आमदार राम शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदारसंघ पूर्वी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. गेल्या निवडणुकीत तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) ताब्यात गेला. पवारांच्या विरोधात बळ देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पराभूत झालेल्या राम शिंदे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले. पराभवानंतर राम शिंदे यांचे समर्थक, भाजप पदाधिकारी रोहित पवारांकडे वळले. अलीकडच्या काळात त्यातील काही पुन्हा शिंदेंकडे परतले. पवारांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्येच नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी फोडाफोडीचे राजकारण रंगले होते. विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत भाजपला ११ हजार मतांनी पिछाडीवर जावे लागले होते.

आणखी वाचा-रायगडमध्ये ‘मविआ’च्या अधिकृत उमेदवारीवरून गोंधळ; शिवसेना ठाकरे गटाकडून उरणमधील शेकाप उमेदवारावर कारवाईची मागणी

कर्जत व जामखेड अशा दोन तालुक्यांचा हा एकत्रित मतदारसंघ. दोन्ही तालुक्यांची राजकीय, भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मतदारसंघ तसा दुष्काळी. काही भागांत कुकडी कालव्याने सुबत्ता निर्माण केली. दोन्ही बाजूंनी मतदारसंघासाठी मोठा निधी आणल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र अनेक योजना अपूर्णावस्थेत आहेत. अंबालिका साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांचेही तालुक्यात प्रभावक्षेत्र आहे. त्याचा राम शिंदे कसा उपयोग करून घेतात, यावरही निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत.

निर्णायक मुद्दे

  • रोजगाराच्या फार संधी उपलब्ध नसल्याने मतदारसंघात स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. औद्याोगिकीकरणाअभावी तरुण बाहेर जात आहेत. असे असतानाही मतदारसंघात एमआयडीसी कुठे स्थापन करायची, याचा वाद रोहित पवार व राम शिंदे या दोघा आमदारांत रंगला होता.
  • मतदारसंघात जातीय समीकरणेही प्रभावी आहेत. मराठा, माळी, धनगर समाजांचे मतदान लक्षणीय आहे. त्याखालोखाल मुस्लीम व मागासवर्गीयांचे मतदान आहे. ही मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होताना दिसतात.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 fight between rohit pawar and ram shinde will be significant print politics news news mrj