गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघात २०१४ पासून सुरू झालेला अग्रवाल विरुद्ध अग्रवाल सामना यंदाही कायम आहे. यावेळी महाविकास आघाडीचे गोपालदास अग्रवाल आणि महायुतीचे विनोद अग्रवाल यांच्यात मुख्य लढत असली तरी बसप, मनसे, वंचितच्या उमेदवारांसह अपक्षांकडून होणाऱ्या मतविभागणीवर जय-पराजयाचे गणित अवलंबून असेल.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी भाजपचे विनोद अग्रवाल यांचा पराभव केला होता. यानंतर गोपालदास अग्रवाल पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे २०१९ मध्ये विनोद अग्रवाल यांना अपक्ष लढावे लागले. त्यावेळी विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा पराभव केला होता. परिणामी विनोद अग्रवाल यांना भाजपतून निलंबित करण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच गोपालदास स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतले आणि २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वाट्यातून उमेदवारीही मिळवली. दरम्यान, विद्यमान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द करून भाजपने त्यांना उमेदवारी दिली.
हेही वाचा – ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप
s
या सोयीच्या ‘पक्षांतर’ आणि ‘पक्षाश्रया’मुळे दोन्ही उमेदवारांत मागील दोन लढतींप्रमाणेच यंदाही अटीतटीचीच लढत आहे. यावेळी भाजपच्या दिमतीला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि त्यातही खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांची मिळत असलेली मोलाची साथ, या आमदार विनोद अग्रवाल यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे, गोपालदास अग्रवाल यांना स्थानिक शिवसेना उबाठाची साथ असून माजी आमदार रमेश कुथे यांचे सहकार्य लाभत आहे.
गोंदिया मतदारसंघात एकूण १५ उमेदवारांपैकी ९ उमेदवार अपक्ष आहेत. याशिवाय इतर राजकीय पक्षांचे चार उमेदवारही रिंगणात आहेत. बंडखोरांच्या मनधरणीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच थेट लढत असली तरी इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. याचा फटका महायुतीला बसतो की महाविकास आघाडीला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.