Article Body Starting: Congress in Sakoli Vidhan Sabha Election 2024: जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत विद्यमान आमदारांनीच आपले वर्चस्व कायम राखले. भंडारा आणि तुमसर मतदारसंघांत महायुतीचे, तर साकोलीमध्ये आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून येथे ‘जुने गडी, नवे राज’, असे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमसर-मोहाडी मतदारसंघात राजू कारेमोरे, भंडारा नरेंद्र भोंडेकर आणि साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काठावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, तीनही मतदारसंघांत झालेली बंडखोरी निष्प्रभ ठरल्याचे निकालावरून दिसून येते. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांचा बदललेला कल आणि महायुतीला मिळालेले मताधिक्य, यामागे राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आणि ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. तीनही मतदारसंघांत विकासाचे आणि स्थानिक मुद्दे मागे पडले. उद्योग, दर्जेदार शिक्षण, बेरोजगारी, पायाभूत-सिंचन सुविधांचा अभाव, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, अशा अनेक मुद्यांना मतदारांनी या निवडणुकीत दुर्लक्षित केले.

हेही वाचा…भिवंडी पश्चिमेत पुन्हा मत विभाजनाचा भाजपला फायदा

भंडारा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या पूजा ठवकर रिंगणात होत्या. भोंडेकर यांनी ठवकर यांच्यावर मात केली. भोंडेकर यांच्याबाबत मतदासंघासह मित्रपक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे त्यांना विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र, मतदानापूर्वीच्या दोन दिवसांत भोंडेकर यांनी केलेली जुळवाजुळव आणि त्यांच्या सोबत ऐनवेळी जुळलेले अदृश्य हात, यामुळे सर्व राजकीय समीकरणे मोडीत काढून विजयश्री खेचून आणण्यात ते यशस्वी झाले. भाजप आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसच्याही असंतुष्टांना स्वतःकडे वळवण्याची किमया त्यांनी साधली. शिवाय लाडक्या बहिणींचीही मते त्यांना मिळाली. परमात्मा एक सेवकचे अनुयायांनीही भोंडेकर यांना समर्थन दिले. या सर्व घडामोडींमुळे येथील चित्र पालटले. दलित, मुस्लीम, कुणबी मते ठवकर यांना तारू शकली असती, मात्र काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी भोंडेकर यांना अदृश्य मदत केल्याने ठवकर लढतीत मागे पडल्या.

तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चरण वाघमारे आणि अजित पवार गटाचे राजू कारेमोरे यांच्यात अटीतटीची लढत होणार, असे भाकीत वर्तवले जात होते. मात्र, येथे कारेमोरे यांनी एकतर्फी विजय संपादन केला. वाघमारे यांना पक्षांतर्गत बंडखोरीचा फटका बसला. भाजपने येथे कारेमोरे यांना जिंकवण्याचा निर्धार केला होता. त्याचाही फायदा त्यांना झाला. ऐनवेळी भाजपमध्ये परतलेल्या मधुकर कुकडे यांच्यासोबत कुणबी समाजाची एकगठ्ठा मते आणि लाडक्या बहिणींचा कौल कारेमोरे यांच्या बाजूने गेला. वाघमारे यांचा पराभव अनेकांच्या पचनी पडला नसल्याचे बोलले जाते.

हेही वाचा…Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक

साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे अजय ब्राह्मणकर यांनी तगडे आव्हान उभे केले. त्यामागे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल हेच कारणीभूत ठरले. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पटोले यांची चर्चा असताना पटेल आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांचे राजकीय वलय संपवण्यासाठी खेळी खेळली आणि यशस्वीही केली. पटोले यांचा अतिआत्मविश्वास, मतदारसंघ आणि विकासाकडे दुर्लक्ष, याबाबी त्यांच्या विरोधात गेल्या. गोड बोलून विजय मिळविता येतो, या त्यांच्या गोड गैरसमजाला तडा गेला. टपाल मतांनी त्यांना तारले खरे, पण गृहजिल्ह्यात अवघ्या दोनशे मतांनी मिळविलेला विजय नानांसाठी अपमानकारकच ठरला. भाजपची मते विभाजित करण्यात बंडखोर सोमदत्त करंजेकर सपशेल अपयशी ठरले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 in bhandara district all the three mlas were re elected nana patole won election with short margin print politics news sud 02