चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचा फायदा भाजपला झाला नाही. उलट नुकसान अधिक झाले. त्यामुळे मोदी यांच्या चिमूर येथील सभेचा लाभ विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा कार्तिक एकादशीच्या दिवशी १२ नोव्हेंबरला चिमूर क्रांतीभूमित झाली. या सभेतून मोदी यांनी भाजपच्या पूर्व विदर्भातील एकूण नऊ उमेदवारांचा प्रचार केला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया, बल्लारपूर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार, ब्रम्हपुरी कृष्णा सहारे, वरोरा करण देवतळे, हिंगणघाट समिर कुणावार आणि उमरेड मतदारसंघातील राजू पारवे यांचा समावेश आहे. प्रचंड गर्दी झालेल्या या सभेत मोदींनी भाजप व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
आणखी वाचा-गडचिरोलीत उमेदवार बदलामुळे भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत
तसेच महायुती सरकारने राज्यातील जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून दिला, भविष्यातदेखील लोकोपयोगी योजना राबविणार, आहे ग्वाही दिली. मात्र, राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विस्मरण झाले. तसेच क्रांतीभूमितील शहीद वीर बालाजी रायपूरकर यांचेही स्मरण पंतप्रधान मोदींनी केले नाही. मोदींच्या सभेत राजुराचे भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांना मंचावर स्थान दिले गेले नाही. त्यामुळे भोंगळे यांना आल्यापावली परत जावे लागले. यावरून मोदींनीच भोंगळे यांची ‘विकेट’ घेतली, अशी चर्चा राजुरा मतदारसंघात सुरू आहे.
आणखी वाचा-शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी यांनी विदर्भात जाहीर सभा घेतल्या होत्या. परंतु तेव्हा भाजपची घोर निराशा झाली. कारण, पूर्व विदर्भात नितीन गडकरीवगळता एकही भाजप खासदार निवडून आला नाही. पूर्व विदर्भातील ग्रामीण भागांत मोदी सरकारविषयी शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. कापूस, सोयाबीन व धानाला भाव नसल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे. भाजपची नेतेमंडळी केवळ निवडणुकीच्या काळात येतात आणि नंतर पाच वर्षे दिसत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. यामुळे मोदींच्या सभेला झालेली गर्दी मतदानात पारवर्तीत होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.