नागपूर : राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असली तरी आघाडी-युतीमधील प्रत्येक घटक पक्षाला त्यांच्या स्वत:च्या पक्षाची काळजी अधिक आहे, जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्या असे त्यांचे प्रयत्न आहे, महायुतीतील भाजप हा त्यापैकीच एक पक्ष. हा पक्ष महायुतीत मोठा भाऊ असूनही मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. नागपूरमध्ये या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या झालेल्या किंवा होऊ घातलेल्या सभा या फक्त भाजप उमेदवारांसाठीच आहेत, मित्र पक्ष शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या (अजित पवार ) उमेदवारासाठी नाही हे स्पष्ट झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा आहेत. या सर्व जागा महायुती लढत आहे. यात सर्वाधिक ११ भाजप तर ऐकमेव रामटेकची जागा शिवसेना शिंदे गट लढवत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या दौऱ्यांची सख्या वाढली आहे. मात्र ते फक्त पक्षाचा उमेदवार असेल अशाच ठिकाणी सभा घेत आहेत. रामटेक या शिवसेनेला सोडलेल्या जागेवर भाजपचे स्टार प्रचारक जात नाहीत हे
येथे उल्लेखनीय.
हेही वाचा : Gondia Assembly Election 2024 : गोंदियातील राहुल गांधींची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार?
u
नागपूरमध्ये नुकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दौरा झाला. त्यांनी फक्त नागपुरात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठीच सभा घेतली. रामटेक शेजारीच आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले रामटेक देशभर प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्यात राम मंदिर उभारणीसाठी योगी आदित्यनाथ यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. एक कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांनी रामटेकला जाऊन महायुतीचे उमेदवार आशीष जयस्वाल यांच्यासाठी प्रचारसभा घेणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही.
१७ नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शङा नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या जिल्ह्यात सावनेर आणि काटोल मतदारसंघात सभा आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. शहा सुद्धा रामटेकला जाणार नाहीत. शहा यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे येऊन गेले. या मतदारसंघात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. अमित शहा यांनी येथील जाहीर सभेत भाजपला विजयी करताना राष्ट्रवादीला पराभूत करा, असे आवाहन मतदारांना केले. भाजप मित्र पक्षाला मोजत नाही, असा संदेश यातून गेला आहे. भाजपचा आणखी एक मित्रपक्ष रिपाई आठवले गट यानेही अशीच खदखद व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Akola West Assembly Constituency : ‘अकोला पश्चिम’मध्ये धार्मिक राजकारणाचा ज्वर चढला
यापूर्वी स्मृती इराणी ,रवीकिशन यांच्या सभा झाल्या, गुरुवारी मिथुन चक्रवर्ती यांची हिंगण्यात भाजप उमेदवाराच्या तर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांची जयताळा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. सध्या तरी भाजपे एकला चलोरेची भूमिका प्रचाराबाबत तरी घेतलेली दिसते.
भाजपसारखा विचार महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेने केला नाही. या पक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दक्षिण नागपूरमध्ये भाजप उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. पण शिंदे यांना तेथे वेळेत पोहचता आले नाही. त्यामुळे शिंदेशिवायच ती सभा पार पडली.