गोंदिया : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकूण ६९.७४ टक्के मतदानाची नोंद झाली. लोकसभा निवडणुकीतील ६६.६७ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढीव मतदानाने उमेदवारांना धडकी भरली असून हा ‘लाडकी बहीण’चा प्रभाव आहे की परिवर्तनाची नांदी, याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये विविध आडाखे बांधले जात आहेत.
गोंदिया मतदारसंघात ७१.०७ टक्के, आमगाव ७२.४२, अर्जुनी मोर. ७०.०० व तिरोडा मतदारसंघात ६५.२० टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या
विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळचे मतदान विक्रमी ठरले. २०१९ मध्ये जिल्ह्यात ६४.५५ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद आमगाव (७२.४२) येथे झाली.
हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यातील वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर?
यंदा महिलांनी उत्साही मतदान केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. लाडकी बहीण योजना आणि एस.टी. मध्ये निम्म्या तिकीटदारत प्रवास, ही यामागील कारणे असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदल आणि आरक्षण हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मुद्दे गौण ठरले आणि स्थानिक मुद्यांवर आणि प्रश्नांवर ही निवडणूक लढवली गेली.
हेही वाचा – महिला, नवमतदारांचा कौल कोणाला? गडचिरोलीत विक्रमी मतदान
मतदारसंघनिहाय पुरुष-महिला मतदानाची टक्केवारी
– गोंदिया
पुरुष – ७२.३७ टक्के
महिला – ६९.८७ टक्के
– आमगाव
पुरुष – ७२.३९ टक्के
महिला – ७२.४६ टक्के
– अर्जुनी मोरगाव
पुरुष – ७०.३१ टक्के
महिला – ६९.७० टक्के
– तिरोडा
पुरुष – ६६.१४ टक्के
महिला – ६४.३० टक्के