ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे या दोन नेत्यांमधील संघर्ष आता टिपेला पोहचला आहे. ‘जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाहीत ते राज ठाकरे यांचे कसे होती’ अशा शब्दात पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदार पुत्रावर टीका केली. यानंतक खासदार शिंदे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कल्याण ग्रामीणमध्ये सक्रिय झाले असून रोड शो, व्यक्तीगत भेटीगाठी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटाच त्यांनी येथे लावला आहे. ‘काहीही झाले तरी राजू पाटील पराभूत झाले पाहीजेत’ अशा शब्दात त्यांनी शिंदे सैनिकांपर्यत स्पष्ट संदेश दिल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा असा नारा देत महायुतीच्या प्रचार सभांना हजेरी लावली. कोकणात नारायण राणे आणि कळव्यात श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्यासाठी राज यांनी स्वतंत्र्य सभाही घेतल्या. राज यांची सभा आपल्या पथ्यावर पडेल असे श्रीकांत शिंदे यांना वाटले होते. मात्र कळव्यातील सभेत त्यांनी ठाणे जिल्ह्यातील नागरीकरणाचा मुद्दा उपस्थित करताना परप्रांतियांच्या वाढत्या गर्दीवर भाष्य केले आणि शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. ‘ही सभा घेतली नसती तर बरे होते’ अशा प्रतिक्रियाही त्यानंतर शिंदे यांच्या गोटात उमटल्या. असे असले तरी राज यांच्या उपस्थितीमुळे ठाणे, कल्याणात मनसेचे नेते, पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय दिसले.

हेही वाचा :सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच

मदतीची परतफेड नाहीच

कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात नेहमीच विसंवाद राहील्याचे गेल्या पाच वर्षात दिसून आले. या मतदारसंघातील विकास कामांचा दर्जा, कंत्राटांची वाढती रक्कम, कामांना होत असलेला विलंब याविषयी राजू पाटील नेहमीच आक्रमक होताना दिसले. खासदार शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. राज ठाकरे यांच्या भूमीकेनंतर मात्र राजू पाटील कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सक्रिय झाले. या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यामध्ये राजू पाटील यांचाही वाटा मोठा होता. त्यामुळे लोकसभेत केलेल्या मदतीची परतफेड खासदार विधानसभेत करतील या आशेवर राजू पाटील समर्थक होते. मात्र दादर-माहीम मतदारसंघात सदा सरवणकर यांच्या ताठर भूमीकेमुळे राज आणि शिंदे यांच्यातील समिकरणे बदलत गेली. त्याचा परिणाम आता कल्याण ग्रामीणमध्येही दिसू लागला आहे. या मतदारसंघातून शिंदेसेनेने राजेश मोरे यांची उमेदवारी जाहीर करताच संतापलेल्या राजू पाटील यांनी ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरे यांचे कसे होतील’ असे वक्तव्य केले आणि तेव्हापासून पाटील, शिंदे यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे.

शिंदे यांच्या वाढत्या फेऱ्या

कल्याण ग्रामीण मधून शिंदेसेनेकडून ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे इच्छुक होते. दिवा परिसरात मोठे प्रस्थ असलेले मढवी उमेदवारी नाकारली गेल्याने नाराज झाले. मढवी यांची नाराजी सोयीची नाही हे लक्षात येताच खासदार शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढली. यानंतर पुढील तीन दिवसात सात सभा, रॅली तसेच स्थानिक बैठकांचा भला मोठा कार्यक्रम शिंदे यांनी या मतदारसंघासाठी राखीव ठेवला आहे. दिवा हा शिंदेसेनेचा बालेकिल्ला असला तरी मागील निवडणुकीत येथून राजू पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. हे लक्षात घेऊन दिव्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका शिंदे यांनी वाढविल्या आहेत. ‘कोणत्याही परिस्थितीत कल्याण ग्रामीणमधून विजय मिळायला हवा’ अशा स्पष्ट सूचना शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला असून ‘राजू पाटील यांना पाडा’ असा संदेश शाखाशाखांमधून पोहचविला जात आहे.

हेही वाचा :चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

काय म्हणाले होते पाटील ?

‘जे शिवसेनाप्रमुखांचे झाले नाहीत ते राज ठाकरे यांचे कसे होतील ? लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांनी आपणास मदतीची गळ घातली होती. त्या बदल्यात २७ गावांमधील विकास कामे मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण तो शब्द त्यांनी पाळला नाही. घाणेरड्या चाली खेळून बाप-बेटे यांनी २७ गावांचा बट्टयाबोळ केला आहे. ते दोघेही बेभरवशाचे आहेत. त्यांना मुळी दानतच नाही’

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 kalyan rural vidhan sabha shrikant shinde vs mns raju patil dispute print politics news css