मुंबई : हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची फसवणूकच केली, अशी टीका तेलंगणातील भाजप नेते व केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, कर्नाटकमधील भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि हिमाचल प्रदेशातील खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने तेलंगणा राज्यच दिवाळखोरीत काढले असून, काँग्रेसची खोटारडेपणाची गाडी आता फिरत महाराष्ट्रात आली आहे. कर्नाटक सरकारचे ४६ हजार कोटी रुपयांचे कर्ज काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ८२ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. महिलांना मोफत बस प्रवास, मोफत तांदूळ, वीज या केवळ घोषणाच राहिल्याचे करंदलाजे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन

तेलंगणातील काँग्रेसने आतापर्यंत एकही आश्वासन पाळले नसून, सरकार केवळ लूट करीत आहे. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करणार, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. अद्याप ४० टक्के शेतकऱ्यांचे कर्जही माफ झालेले नाही, असे रेड्डी यांनी नमूद केले.

हिमाचल प्रदेशात दोन रुपये किलो दराने शेण विकत घेऊ, १०० रुपये दराने दूध खरेदी करू, असे सांगण्यात आले होते. सरकारला दोन वर्षे होऊनही अजून शेणखरेदी व दूधखरेदी सुरू झाली नाही. हिमाचल प्रदेशात दरमहा ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते, पण ते न देता आमचे सरकार १२५ युनिट वीज मोफत देत होते, तीही त्यांनी बंद केली व वीजेचे दरही वाढविले, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

काँग्रेसकडून ओबीसींचे शोषण : नायब सिंह सैनी

काँग्रेसने ओबीसी समाजाचे कायम शोषणच केले. ओबीसींना कधीही अधिकार दिले नाहीत, उलट त्यांचेच अधिकार अन्य वर्गाला दिले, असा आरोप सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांमुळेच हरियाणात जनतेने काँग्रेसला नाकारले. प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने जितकी कामे केली नाहीत, त्याहून अधिक कामे केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केली. महाराष्ट्रातही डबल इंजिन सरकारचा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन सैनी यांनी केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 karnataka telangana and himachal pradesh bjp leaders criticized congress print politics news zws