छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सर्वाधिक मतदान सिल्लोड मतदारसंघात ८०.०१ टक्के एवढे नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे या मतदारसंघात एक लाख ३६ हजार ९५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावत सर्वाधिक ७९.४१ टक्के मतदान नोंदवले. पैठण, वैजापूर या शिवसेनेतील फूट पडलेल्या मतदारसंघातील महिला मतदारांचे प्रमाण अनुक्रमे ७५.७६ व ७४.१४ टक्के असल्याचे दिसून आले आहे.
केवळ औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात हे प्रमाण ५९.९४ एवढे आहे. शहरी भागातील मतदारांनी मतदानाकडे काही अंशी पाठ फिरवली असल्याची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगास कळविण्यात आली आहे. आकडेवारी हाती आल्यानंतर पुन्हा एकदा विजय आणि पराजयाचे दावे नव्याने केले जात आहेत. सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ हेच विजयाचे गणित असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा : Imtiaz jaleel: अतुल सावेंकडून पैसे वाटून मतदान खरेदी, इम्तियाज जलील यांचा आरोप
संभाजीनगर जिल्ह्यातील शहरी मतदारसंघात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ५९.३५ टक्के मतदान नोंदविण्यात आले. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अचानक बदलण्यात आले होते. किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची उमेदवारी घेतल्याची घोषणा केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली. शहरातील तिन्ही मतदारसंघांत औरंगाबाद मध्य ५९.३५, औरंगाबाद पश्चिम ६०.५८ आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ६०.६३ टक्के मतदान झाले. सिल्लोड मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीमुळे नव दावे केले जात आहेत. शिवसेनेत फूट पडलेल्या वैजापूर मतदारसंघात ७५.५४ टक्के मतदान नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील नऊपैकी पाच मतदारसंघांत ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. महिलांचा वाढता टक्का निकालावर परिणाम करू शकणारा ठरू शकतो, असेही विश्लेषण आता पुढे येत आहे.