मालेगाव मध्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालेगाव : मुस्लीमबहुल मालेगाव मध्य मतदार संघात ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल आणि ‘इस्लाम’ पक्षाचे आसिफ शेख या पारंपरिक विरोधकांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मौलाना यांना धार्मिक वलयाचा आधार मिळत असला तरी, प्रतिस्पर्धी शेख यांनी मागील पराभवातून बोध घेत तयारी केल्याने मौलांनापुढे त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. या दोघांच्या मुख्य लढाईत समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद आणि काँग्रेसचे एजाज बेग यांनी रंग भरले आहेत.

मौलाना मुफ्ती यांनी ‘तिसरा महाज’ नावाचा सवतासुभा उभा करत राजकारणात पाऊल ठेवले. त्या माध्यमातून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा ते विजयी झाले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना काँग्रेसच्या आसिफ शेख यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. पुढे ते ‘एमआयएम’मध्ये दाखल झाले. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार आसिफ शेख यांना पराभूत केले. काँग्रेसचा त्याग करत मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या शेख यांनी राष्ट्रवादीलाही सोडचिठ्ठी दिली. आता ते इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) या नावाने पक्ष नोंदणी करून निवडणुकीला सामोरे जात आहेत. शेख कुटुुंबीयांचा शहरात राजकीय दबदबा आहे. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे खोलवर जाळे ही शेख यांची बलस्थाने आहेत.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?

समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद आणि काँग्रेसचे एजाज बेग हे इतर दोन प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शान या जनता दलाचे दिवंगत ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांच्या कन्या आहेत. समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याच्या दृष्टीने प्रारंभी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार शान यांच्यासाठी मालेगाव मध्यची जागा पदरात पाडून घ्यावी म्हणून समाजवादी पक्ष आग्रही होता. मात्र बोलणी फिस्कटल्याने समाजवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना स्वतंत्र लढावे लागत आहे.

निर्णायक मुद्दे

●यंत्रमाग हा प्रमुख व्यवसाय असलेले मालेगाव हे बकाल आणि झोपडपट्ट्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. किमान मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागणे हे येथील रहिवाशांसाठी नवे नाही. असे असतानाही विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांभोवतीच येथील निवडणूक प्रचार घुटमळत असल्याचे दिसते.

●धर्मगुरू म्हणून मौलाना यांचा शहरात मोठा चाहता वर्ग आहे. परंतु महायुतीशी असलेली त्यांची ‘कथित’ सलगी त्यांना तापदायक ठरणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मध्यंतरी मालेगावात झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात मौलाना हे चक्क व्यासपीठावर उपस्थित होते. ते भाजपला अनुकूल भूमिका घेतात, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 mla maulana mufti ismail vs asif sheikh maharashtra assembly election 2024 print politics news zws