जळगाव, धुळे : वक्फ मंडळासंदर्भातील कायदा बदलणे गरजेचे झाले आहे. राहुल गांधी यांचा त्यास विरोध आहे. परंतु, कितीही विरोध झाला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वक्फ मंडळ कायदा बदलणारच, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. काँग्रेससाठी महाराष्ट्र हे फक्त पैशांनी भरलेले ‘एटीएम’ असून महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते राज्यातील सर्व पैसा दिल्लीला घेऊन जातील, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी अमित शहा यांच्या उत्तर महाराष्ट्रातील शिंदखेडा आणि चाळीसगाव मतदारसंघात सभा झाल्या. या सभांमध्ये शहा यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडतानाच महायुती सरकारच्या योजनांचे कौतुक केले. महाविकास आघाडीवाले ठिकठिकाणी दंगल घडवून आणत आहेत. दंगलखोरांना आघाडीकडून पुढे केले जात आहे. यामुळे हे लोक राज्याच्या हिताचे नाहीत, असे शहा म्हणाले. जी व्यक्ती मुख्यमंत्री असताना कोरोनाचे निमित्त करून घरातच बसून होती; ती व्यक्ती आता महाराष्ट्र वाचविण्याची भाषा करत आहे, अशी टीका शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केली. राहुल गांधी हे मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करीत आहेत, मात्र हे आरक्षण द्यायचे असेल, तर मागासवर्गाला देण्यात आलेले आरक्षण काढून घ्यावे लागेल. यामुळे राहुल गांधी यांची मागणी कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, असेही शहा यांनी अधोरेखित केले.