नाशिक : शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्तेत जाण्याचे ठरविले होते. यासंबंधीच्या पत्रावर आपल्यासह सर्व आमदारांची स्वाक्षरी होती, परंतु तेव्हा अशा काही घटना घडल्या की जमले नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी आणि बुधवारी जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या स्थानिक उमेदवारांविरोधात जाहीर सभा घेत फुटिरांवर टीकास्त्र सोडले होते. पाठोपाठ गुरुवारी राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचारार्थ निफाड, दिंडोरी आणि सिन्नर मतदारसंघात जाहीर सभा घेत प्रत्युत्तर दिले. महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सर्व आमदारांनी घेतला होता. यासंबंधीच्या पत्रावर स्वाक्षरी असणाऱ्यांमध्ये जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचाही समावेश होता, असे अजित पवार यांनी सांगितले. वरिष्ठांच्या निर्णयानुसार प्रारंभी आपण अडीच वर्षे शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीत सत्तेत होतो. शिवसेना-काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. शिवसेना-भाजपची मिळतीजुळती आहे. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होणे चालते, भाजपबरोबर का चालत नाही, असा प्रश्न करीत अजितदादा यांनी २०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली. करोनाकाळात फारशी कामे करता न आल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा दावा केला. लाडकी बहीण योजनेची चेष्टा करणाऱ्या विरोधकांनी बहिणींना कधी सव्वा रुपये दिला नाही, अशी टीका त्यांनी केली. प्रचारात शरद पवार यांनी झिरवळांना लक्ष्य केले, पण काही मतदारसंघात आपल्या आमदारांचे नाव घेतले नसल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
छगन भुजबळ यांच्या मतदारसंघाकडे पाठ?
पहाटेचा शपथविधी आणि नंतर महायुतीत सत्तेत सहभागी होताना साथ देणाऱ्या आमदारांपैकी निफाडचे दिलीप बनकर, दिंडोरीचे नरहरी झिरवळ आणि सिन्नरचे माणिक कोकाटे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाकडे मात्र पाठ फिरवली. जिल्ह्यातील तीन सभांनंतर त्यांची चौथी सभा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे नियोजित होती. शरद पवार यांनी येवल्यात सभा घेऊन भुजबळांवर कठोर शब्दांत टीका केली होती. अन्य आमदारांसाठी सभा घेणारे अजितदादा भुजबळांच्या मतदारसंघात मात्र गेले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
झिरवळ आदिवासी असल्याने शरद पवार यांची टीकानरहरी झिरवळ हे आदिवासी असल्यानेच त्यांना शरद पवार यांनी लक्ष्य केले, असा आरोप अजित पवार यांनी दिंडोरीतील जाहीर सभेत केला. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाने सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग केला आहे. महायुतीत ज्या जागा आम्हाला मिळाल्या, त्यातील १२.५० टक्के जागांवर आदिवासी समाजाचे उमेदवार दिले. मागासवर्गीय घटकाला १२.५० टक्के, तर मुस्लीम समाजाला १० टक्के जागा दिल्या. कुठलाही भेदभाव केला नसून सर्वांना बरोबर घेऊन आपण मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी सूचित केले.