Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress NCP Nomination Applications : महाविकास आघाडीच्या काही जागा वाटपाची चर्चा अजून शिल्लक असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसने अजूनही उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, या दोन्ही पक्षांकडून काही मतदारसंघात गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
विदर्भात काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. ठाणे जिल्ह्यातील कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघाकरिता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षाने पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ८५ जागांचे वाटप जाहीर केले. त्यानंतर लगेच शिवसेनेने (उद्धव ठाकरे) त्यांच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवाराची यादी अद्याप जाहीर केली नाही. मात्र, संभावित उमेदवारांना एबी फॉर्म वितरित केले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर आहे.
मुहूर्ताला प्राधान्य
२४ ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग असल्याने उमेदवारांनी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत अर्ज भरण्याला प्राधान्य दिले. बहुतांश राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
सावनेरमध्ये केदार यांच्या पत्नी रिंगणात
काँग्रेसकडून नागपूर जिल्ह्यात सावनेर मतदारसंघात अनुजा केदार यांनी अर्ज दाखल केला. माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा झाल्याने ते अपात्र झाले आहेत. त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे केदार यांच्या पत्नी अनुजा यांना सावनेर मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.
“आज काँग्रेस उमेदवारांची यादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पाठवणार असून उद्या, सायंकाळपर्यंत काँग्रेसची उमेदवाराची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.” – नाना पटोले, प्रदेशाध्याक्ष, काँग्रेस