लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : अदानी कंपनीला मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करण्याचे कंत्राट दिल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘बेस्ट’ उपक्रम तोट्यात गेला असून परिणामी सामान्य मुंबईकरांचा प्रवास महाग आणि वीज दर अधिक झाले आहेत, अशी टीका ‘वंचित बहुजन आघाडी’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मुंबईतील प्रचारसभांमध्ये आंबेडकर यांनी टीका केली. आंबेडकर म्हणाले की, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, बेस्ट प्रवास व वीज स्वस्त करण्यासाठी तसेच मुंबईकरांना दिवसा पाणी मिळण्यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवारांना मते द्या. महायुती सरकार सत्तेत पुन्हा आले तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाला उत्पन्नाची अट लावली जाईल. त्यामुळे एका पिढीनंतर आरक्षण संपणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती सरकार घाईने घेवून इतर मागास वर्गीयांना मिळणारे २७ टक्के आरक्षण मोडीत काढेल, असा इशारा त्यांनी दिला.
आणखी वाचा-अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
शहाबानो प्रकरणी मुस्लिम समाजाने ज्याप्रमाणे सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले होते, त्याप्रमाणे वंचित समुहांनी एकी केली तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाला लावण्यात येणाऱ्या उत्पन्नाच्या अटीसंदर्भात भाग पाडू शकतो, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी अर्थतज्ञ राहूल गायकवाड, वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची भाषणे झाली. यावेळी मुंबई शहरातील ‘वंचित’चे सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या राज्यात २०० जागा लढवत आहे.