नागपूर: महाविकास आघाडीच्या (शिवसेना ठाकरे गट) उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्यामुळे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले काँग्रेस नेते व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या प्रचारात खुद्द रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी मंत्री सुनील केदार उतरल्याने शिवसेना संतापली आहे. दुसरीकडे रामटेकचे बंडखोर राजेंद्र मुळक हे त्यांच्या जुन्या उमरेड मतदारसंघात काँग्रेस उमदवारासाठी प्रचारसभा घेत आहेत आणि त्यात पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना करीत आहेत. त्यामुळे रामटेकचे बंडखोर उमरेडमध्ये पक्षनिष्ठ कसे ? असा सवाल आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातूनच विचारला जात आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विशाल बरबटे आणि काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक अशी तिहेरी लढत आहे. मात्र सध्या येथे गाजत आहे तो काँग्रेस बंडखोरीचा मुद्दा.लोकसभा निवडणुकीतही रामटेकची चर्चा काँग्रेस उमेदवार रिंगणातच राहू नये यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नामुळे राज्यभर झाली होती. केदार यांच्या चाणाक्ष खेळीमुळे भाजपचा डाव फसला आणि येथून काँग्रेस विजयी झाली. या निवडणुकीत काँग्रेसला लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य पक्षाच्या नेत्यांचा उत्साह वाढवणारे ठरले व त्यांनी सर्व सहाही जांगांवर दावा केला. पण शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रामटेक सोडायला नकार दिला. दुसरीकडे मागील तीन वर्षांपासून या मतदारसंघात तळ ठोकून बसणारे राजेंद्र मुळक यांच्यासाठी काँग्रेस अडून बसली. अखेर तोडगा निघाला नाही आणि जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे मुळक यांनी बंड केले. त्यामुळे पक्षाने त्यांना काँग्रेसमधून निलंबित केले. आता प्रश्न होता तो महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस नेते कोणाचा प्रचार करणार याचा. जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना नागपूर जिल्ह्यातून सर्व सहाही जागा महाविकास आघाडीच जिंकेल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे केदार शिवसेनेचाच प्रचार करतील असा अंदाज होता. मात्र केदार यांनी त्यांच्या स्वभावानुसार काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा मुळक यांच्या पाठीशी उभी केली. रामटेकचे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे, जि.प.च्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह खुद्द सुनील केदार सोमवारी मुळक यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेना कमालीची संतापली आहे.
हेही वाचा >>>हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी याबाबत तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. ‘ज्या शिवसेनेने कुठलीही अट न घालता काँग्रेसला एका शब्दावर रामटेक लोकसभा मतदारसंघ सोडला, त्याच काँग्रेसने सहा महिन्यातच शिवसेनेशी गद्दारी करावी हे संतापजनक आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. रामटेकच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस, असे चित्र रामटेक मतदारसंघात सध्या पाहायला मिळते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
उमरेडमध्ये मुळकांकडून काँग्रेसचा प्रचार
रामटेकमध्ये पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने ज्या राजेंद्र मुळक यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. तेच मुळक बाजूच्या उमेरड मतदारसंघात काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांचा प्रचार करीत आहेत. काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करीत आहेत. कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेचे धडेही देत आहेत. एकूणच मुळक सध्या बंडखोर आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत दोन मतदारसंघात वावरत आहेत. याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा >>>मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
काँग्रेस कारवाई करणार का?
रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेची होती, ती आम्ही काँग्रेसला दिली. नुसती दिली नाही तर सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करून ही जागा निवडून आणली. कळमेश्वरच्या सभेत खुद्द काँग्रेस नेते सुनील केदार यांनी ही बाब मान्य केली होती. आणि आता त्याच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत रामटेकमध्ये दगाबाजी केली. त्यांनी बंडखोर उभा केला आणि पक्षाचे नेतेही त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहे. काँग्रेसने बंडखोरावर कारवाई केली तरी त्यांच्या प्रचारात सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करणार का? हा प्रश्न आहे.- प्रमोद मानमोडे, जिल्हाप्रमुख शिवसेना, नागपूर जिल्हा