नवी मुंबई : भाजपच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधातील बंडाला साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणाऱ्या शिवसेनेने ( शिंदे) ऐरोलीत मात्र बंडोबांच्या मोठया समूहालाच अभय दिल्याचे चित्र आहे. भाजप नेते गणेश नाईक यांच्याविरोधात पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले रिंगणात आहेत. चौगुले यांना पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकारणी सदस्यांची खुलेआम साथ असली तरी त्याकडे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने ढुंकूनही पाहीलेले नाही. विशेष म्हणजे स्वत: गणेश नाईक हेदेखील बंडखोरांची मनधरणी करत नसल्याने ऐरोली शिंदेसेना विरुद्ध नाईक हा सामना टिपेला पोहचला आहे.
हेही वाचा : भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेत बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. बेलापूरात मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी केलेली बंडखोरी राज्यातील राजकीय वर्तुळातही गाजली. संदीप यांचे बंड ताजे असताना बेलापूरात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते विजय नहाटा यांनीही बंडखोरी केली. ऐरोलीत भाजपने गणेश नाईक यांनाच उमेदवारी दिली आहे. तेथे नाईक यांच्या विरोधात शिंदेसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले रिंगणात आहेत. नवी मुंबईत असा बंडखोरांचा सामना रंगला असताना तीन दिवसांपुर्वी भाजपने संदीप नाईक यांच्यासह पक्षाच्या २५ माजी नगरसेवकांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. भाजप आपल्या बंडखोरांवर कारवाई करत नसेल तर आम्ही का करावी असा सवाल शिंदेसेनेतून उपस्थित केला जात होता. अखेर भाजपने बंडखोरांवर कारवाई करताच शिंदेसेनेने मंगळवारी सायंकाळी पक्षाच्या सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना विजय नहाटा यांच्या बंडाला उभारी देणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांकडे मात्र शिंदेसेनेने डोळेझाक केल्याची चर्चा आता रंगली आहे. नहाटा यांच्या बंडाला नेरुळ भागातील पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांने भलतीच हवा दिली होती. शिवसेनेतील बंडानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीलेला हा पदाधिकारी पुढे नहाटांनी उपकृत केल्याची चर्चा होती. या पदाधिकाऱ्याने नहाटा यांच्या बंडाला उघड साथ दिली खरी मात्र कारवाईच्या कचाट्यातून त्याची आश्चर्यकारकरित्या सुटका झाली आहे.
हेही वाचा : अकोल्यामध्ये लोकसभेतील मतांचे गणित विधानसभेत कायम राहणार?
ऐरोलीतील बंडाला खुली साथ
बेलापूरात किमान सात पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई केल्याचे चित्र शिंदेसेनेकडून उभे केले गेले. ऐरोलीत मात्र गणेश नाईक यांच्याविरोधातील बंडाला शिंदेसेनेची खुली साथ आहे की काय असे चित्र आहे. चौगुले यांचे बंड रोखण्यासाठी शिंदेसेनेतून सुरुवातीपासून फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यांच्या बंडखोरीला पक्षातील जवळपास २५ माजी नगरसेवकांची खुली साथ आहे. पक्षाचे पदाधिकारी, प्रभावी नेते, कार्यकारणीतील सदस्य अशी सर्व मंडळी चौगुले यांच्यासोबत खुलेआम फिरत आहेत. असे असताना त्यांच्यापैकी एकावरही अजून कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे गणेश नाईक यांनीही याठिकाणी पक्षापेक्षा स्वत:ची स्वतंत्र्य यंत्रणा प्रचारात उतरवली आहे. त्यामुळे नवी मुंबईचे दौरे करणारे भाजपचे नेते ऐरोलीपेक्षा बेलापूरमध्येच ठाण मांडून असल्याचे चित्र आहे.