नगर : जिल्ह्यात सध्या श्रीरामपूर मतदारसंघाची निवडणूक विशेष चर्चेची ठरली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ मिटतो ना मिटतो तोच महायुतीमध्ये बेबनाव सुरू झाला आहे. श्रीरामपूरमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) या दोन घटक पक्षांचे उमेदवार आपापसात झुंजत आहेत. त्यामध्ये भाजपचे नेते आणि पदाधिकारी विभागले गेले आहेत. त्यातूनच मुख्यमंत्र्यांची जाहीर केलेली सभा ऐनवेळी रद्द करावी लागली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीरामपुरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील गटबाजीतून उमेदवारी नाकारली गेली. तत्पूर्वी कानडे यांच्या समर्थकासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सभाही घेतली होती. मात्र उमेदवारीची माळ ऐनवेळी हेमंत ओगले यांच्या गळ्यात टाकली गेली. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना) यांच्या भेटीला गेलेले लहू कानडे उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी) यांच्याकडून उमेदवारी घेऊन परतले. महायुतीच्या विरोधात बोलणाऱ्या कानडे यांना महायुतीची तरफदारी करावी लागत आहे. त्यांनी छापलेला लेखाजोखा, इतर प्रचार साहित्य गुंडाळून ठेवून पुन्हा नव्याने तयार करावे लागले. दरम्यान माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारी मिळवली. तेही शिवसेनेच्या चिन्हावर लढत आहेत. परिणामी महायुतीतच लढाई सुरू झाली. आपणच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा कानडे व कांबळे करत आहेत.

आणखी वाचा-मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे

दोघांनी अपापल्या प्रचार फलकांवर महायुतीच्या नेत्यांना स्थान दिले आहे. मात्र कांबळे यांच्या प्रचार फलकांवर आपले छायाचित्र पाहून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे संतापले व त्यांनी त्याबद्दल कांबळे यांना जाहीर सभेतून सुनावले. त्याचवेळी कानडे व कांबळे यांच्या उमेदवारीवरुन श्रीरामपुर भाजपची दोन गटात विभागणी झाली. भाजपमधील विखे समर्थकांचा गट कानडे यांच्या मागे तर भाजपमधील निष्ठावंतांचा, विखे विरोधी गट कांबळे यांच्या प्रचारात उतरला सक्रिय झाला आहे. परिणामी महायुतीतील घटक पक्षांचे दोन उमेदवार आणि त्यामध्ये विभागला गेलेला भाजप असे बेबनावाचे चित्र निर्माण झाले.

आणखी वाचा-Chandrapur Assembly Constituency : काँग्रेसमधील गटबाजी कायमच, चंद्रपूर जिल्ह्यात बड्या नेत्यांचा ठराविक मतदारसंघातच प्रचार

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार सभांचा दौरा जाहीर झाला, कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांची श्रीरामपुरमध्ये सभा होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांची दुसरी सभा नेवाशात झाली. मात्र ऐनवेळी सोमवारी होणारी मुख्यमंत्र्यांची श्रीरामपुरमधील सभा रद्द करण्यात आल्याचा निरोप कांबळे यांना देण्यात आला. त्या धसक्याने कांबळे यांचा रक्तदाब वाढला आणि ते ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रुग्णालयात दाखल झाले. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारी मागे घेण्याचा निरोप देण्यात आला मात्र कांबळे यांनी त्यास नकार देत व्हिलचेअरवर बसून सलाईन लावलेल्या अवस्थेत प्रचारफेरी सुरु केली. श्रीरामपुरमधील निवडणुकीने मतदारसंघातील, महायुतीमधील तिन्ही पक्षांचा अंतर्गत बेबनाव अधिक उघड केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 shrirampur ahmednagar assembly constituency mahayuti ajit pawar ncp vs shivsena shinde group print politics news mrj