मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्ष व आघाड्यांची मोठी भाऊगर्दी झाली असून, आंबेडकरी विचारांचे तब्बल सहा पक्ष-आघाड्या विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. या सहा पक्षांची उमेदवार संख्या ६७४ इतकी असून सर्वाधिक जागा बहुजन समाज पक्ष (बसप) व वंचित बहुजन आघाडी लढवत आहे.

उत्तरप्रदेशच्या मायावती यांच्या ‘बसप’ने सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने २०८ उमेदवार उभे केल आहेत. प्रकाश शेंडगे, अॅड. सुरेश माने व संजय कोकरे यांची ‘आरक्षणवादी आघाडी’ १२५ जागा लढवत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची ‘रिपाइं’ (अ) १, आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना ४० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर अनुसूचित जातीसाठी राखीव २० विधानसभा जागा लढवत आहेत.

हेही वाचा :नाराजांची समजूत घालण्याचा भाजपकडून प्रयत्न, काँग्रेसमध्ये श्रेष्ठींकडे लक्ष

आंबेडकरी विचाराच्या राजकीय पक्षांशिवाय विविध आंबेडकरी गट मविआ आणि महायुती या दोन्ही आघाड्यांत आहेत. महाविकास आघाडीला प्रोग्रेसीव्ह रिपब्लिकन पार्टीचा तर महायुतीला जागेंद्र कवाडे यांचा पाठिंबा आहे.

हेही वाचा :कोल्हापुरात महायुती, महाविकास आघाडी, तिसऱ्या आघाडीतही बंडखोरीचे ग्रहण

लोकसंख्या सुमारे ८० लाख

● २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या १ कोटी ३२ लाख इतकी (११. ५० टक्के) आहे. त्यामध्ये सर्वांत मोठा गट बौद्ध धर्मियांचा असून या समाजाची लोकसंख्या सुमारे ८० लाख आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आंबेडकरी पक्षांचे बहुतांश नेते बौद्ध समाजातून आलेले आहेत.

● २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये वंचित बहुजनने ४७ मतदारसंघात १५ लाख मते घेतली होती. आठवले यांच्या ‘रिपाइं’ने ४ मतदारसंघात ९ हजार, रिपब्लिकन सेनेने एका मतदारसंघात १८ हजार आणि मायावतींच्या ‘बसप’ने ४७ जागांवर ४ लाख २० हजार मते घेतली.

● विधानसभेच्या मैदानातील या सहा आंबेडकरी पक्ष व आघाड्यांनी सर्व जातीधर्माचे उमेदवार दिले असले तरी त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार बौद्ध आहेत. लोकसभेला ‘संविधान रक्षण’ हा कळीचा मुद्दा होता. त्या निवडणुकीत बौद्ध समाज ‘मविआ’ उमेदवारांच्या पाठिशी उभा राहिला होता.