सोलापूर: १९५२ पासून सोलापूर दक्षिणची प्रत्येक विधानसभा निवडणूक लढविलेल्या आणि काही अपवाद वगळता जवळपास प्रत्येक वेळी निवडून आलेला काँग्रेस पक्षाचा उमेदवार यंदाच्या प्रथमच निवडणूक रिंगणात नाही. महाविकास आघाडीअंतर्गत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे गेला आहे. त्यामुळे गोंधळलेले काँग्रेसजन अपक्ष उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. एकीकडे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याविरुद्ध सार्वत्रिक नाराजी असूनही महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे भाजपची विजयाची वाट सुकर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमर रतिकांत पाटील, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मागील २०१९ सालच्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसने बळीचा बकरा म्हणून उभे केलेल्या सय्यद बाबा मिस्त्री यांनी द्वितीय क्रमांकाची ५८ हजार मते घेतली होती. यंदा हेच बाबा मिस्त्री प्रहार संघटनेकडून उभे आहेत.
हेही वाचा : लक्षवेधी लढत : ‘मैत्रीपूर्ण’ लढतीत फायदा कोणाला?
एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसचा पारंपरिक गड राहिलेल्या सोलापूर दक्षिणची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोडवून घेत असताना ती राखण्यात काँग्रेसचे नेतृत्व कमी पडले आणि आता दुसरीकडे स्थानिक काँग्रेसजन महाविकास आघाडीच्या विरोधात अपक्ष धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. स्वत: खासदार प्रणिती शिंदे व त्यांचे पिता सुशीलकुमार शिंदे दोघेही महाविकास आघाडीचा धर्म पाळत नसल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात येऊन प्रणिती शिंदे यांची कानउघाडणी केली, तरीही त्या ठाकरे गटाच्या प्रचारात उतरल्या नाहीत. विमानसेवेसाठी कथित अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आल्याने त्यांचा सूड उगवण्यासाठी काडादी मैदानात उतरले आहेत.
निर्णायक मुद्दे
● सोलापूर दक्षिणमध्ये शहर हद्दवाढ भाग-जुळे सोलापुरात पाणीपुरवठा, भुयारी गटारी, रस्त्यांचा प्रश्न प्रलंबितच आहे.
● शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. अंतिम टप्प्यात असलेली सोलापूर समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित झाल्यास उजनी धरणातून भीमा नदीत चार ते पाच वेळा सोडले जाणारे पाण्याचे आवर्तन बंद होणार आहे.
लोकसभेतील राजकीय चित्र
● महाविकास आघाडी : १,०५४७४ ● महायुती : ९६,०३८ मते