ठाणे : शिवसेनेतील मोठया फुटीनंतर ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्याकडे पुर्णपणे पाठ फिरविल्याने ठाकरे समर्थक शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात निवडणूक लढवेन’ अशी घोषणा करत ठाण्यातील आपल्या समर्थकांमध्ये आदित्य यांनी उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न फुटीनंतर केला होता. ही निवडणुक लढविणे दूर त्यांच्या प्रचार दौरा कार्यक्रमात ठाण्यातील एकही सभा अथवा रॅलीचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. येथील १८ विधानसभा मतदारसंघात शिंदे आणि भाजपचा वरचष्मा असून यंदाच्या निवडणुकीतही येथील कामगिरी उत्तम राखण्याची आशा महायुतीला वाटत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील वेगवेगळ्या भागात महायुतीचा पराभवाचे धक्के बसत असताना ठाणे, कल्याण, पालघरची जागा शिंदे आणि भाजपने जिंकली. भिवंडीत समोर दिसत असलेला पराभव कपील पाटील यांच्या अतिआत्मविश्वासामुळे दुर गेल्याची भावना भाजपमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही ठाणे जिल्ह्यातील शिंदे-भाजपचा बालेकिल्ला भेदणे महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांकडे लक्ष लागून राहीलेल्या उद्धव सेनेच्या नेते, पदाधिकारी आणि उमेदवारांच्या पदरी निराशा येते की काय अशी सध्याची परिस्थिती आहे.

आणखी वाचा-अजित पवारांचे दरोडा शिवसैनिकांना नकोसे

उद्धव यांच्या तीन सभा, आदित्य यांचा दौरा अनिश्चितच

लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण लोकसभेत ठाकरे गटाचा पराभव झाला. शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी नगरसेवकांनी शिंदे यांची साथ दिली. शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. तेव्हापासून ठाण्यात शिंदे विरुद्ध विचारे असा सामना रंगला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून निवडणुक लढणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिले होते. या आव्हानाच्या माध्यमातून आदित्य यांनी एकप्रकारे पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या घोषणेमुळे कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना रंगेल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत आदित्य यांच्याऐवजी केदार दिघे यांचे नाव होते.

आणखी वाचा-अमरावती : विरोधाभासी राजकारणामुळे मतदारही संभ्रमित !

आदित्य हे केदार दिघे यांच्या प्रचारासाठी रॅली किंवा सभा होईल, असा प्रयत्न सध्या ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांचा आहे. आदित्य यांच्या निवडणुक प्रचार कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात प्रचार सभा अथवा रॅलीचे नियोजनही नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे हे एका दिवसात डोंबिवली, ठाणे, ऐरोली अशा भागात तीन सभा घेणार आहेत. आदित्य यांच्या नियोजनात मात्र अजून तरी ठाण्याचा समावेश झालेला नाही, अशी माहिती उद्धव सेनेतील ठाण्यातील एका बड्या नेत्याने दिली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आदित्य यांचा रोड शो ठाण्यात होऊ शकेल असे या नेत्याने सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 there is no election campaign tour of aditya thackeray in thane district print politics news mrj