कुडाळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विद्यामान आमदार वैभव नाईक विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राणे पुत्र नीलेश राणे यांच्या अत्यंत अटीतटीची लढत होत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळ मतदारसंघातून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता नीलेश राणे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राणे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांनी मिळून तयार झालेल्या कुडाळ मतदारसंघात २ लाख १७ हजार १८६ मतदार आहेत. यात १ लाख ७६ हजार ९६४ पुरुष तर १ लाख ९ हजार २२१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. ‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली. मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडणार आहेत. या मतदारसंघात एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही वैभव नाईक आणि नीलेश राणे यांच्यातच होणार आहे.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!

महायुतीच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला. मात्र पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपच्या नीलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. खासदार नारायण राणे हे स्वत: नीलेश राणे यांच्यासाठी मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

कुडाळ मतदारसंघातून २००९ मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून शिवसेनेच्या वैभव नाईक यांचा २४ हजार २९५ मतांनी पराभव केला होता. तर २०१४ मध्ये शिवसेनेचे वैभव नाईक यांनी काँग्रेसच्या नारायण राणे यांचा १० हजार ३७६ मतांनी पराभव केला होता. हा पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे कुटुंब निवडणुकीत उतरले असल्याचे सध्या पहायला मिळत आहे. गेली १० वर्षे या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव नाईक यांना रोखण्याचे आव्हान राणेंसमोर असणार आहे.

निर्णायक मुद्दे

●निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने नीलेश राणे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राणे कुटुंबावर घराणेशाहीचे आरोप केले जाऊ लागले आहेत.

● सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबातील एक भाऊ भाजपमधून, दुसरा भाऊ शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढत आहे. याशिवाय नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेतच. एका घरात खासदारकी आणि दोन आमदार देणार का, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

● मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा मुद्दा मतदारसंघात गाजत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 ubt mla vaibhav naik vs nilesh rane kudal assembly constituency print politics news zws