मुंबई : मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रकल्प रोखून धरले. पण महायुती सरकारने या प्रकल्पांना वेग देत ते मार्गी लावले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार प्रकल्प रोखणारे सरकार असल्याचा आरोप सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात आहे. या आरोपांना शिवसेनेने (उद्धव ठाकरे) फलकबाजीतून उत्तर दिले आहे. करोनाकाळात अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मेट्रोची कामे सुरू ठेवली, तो खरा नेता अशा आशयाचे फलक ठाकरे गटाने मुंबईत अनेक ठिकाणी लावले आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मुंबई महानगरपालिकेसह अन्य काही सरकारी यंत्रणा मुंबईत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबवीत आहेत. एमएसआरडीसीकडून राज्यभर रस्त्यांचे, महामार्गांचे जाळे विणले जात आहे.
राज्याची प्रगती पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते, तर राज्याचेच नव्हे तर देशाचे राजकारण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या भोवती फिरते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत विकास प्रकल्प प्रचाराच्या केंद्रस्थानी असतात. त्यानुसार भाजपाकडून सातत्याने १० वर्षांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या, पूर्ण करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांचा लेखाजोखा सभेतून, कार्यक्रमातून वा निवडणूक प्रचारातून मांडला जात आहे.
हेही वाचा >>> मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
मोदींच्या सभेतही अटल सेतू, मेट्रो, सागरी मार्ग, समृद्धी महामार्ग कसे पूर्ण केले आणि त्यामुळे राज्याची भाग्यरेषा कशी बदलत आहे यावर भर दिला जात आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याकडूनही नेहमीच विकास प्रकल्पांवर भर दिला जातो.
आपण विकास प्रकल्प राबवित असतानाच दुसरीकडे विरोधक त्यातही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात प्रकल्प कसे रोखून धरले याबाबत टीका करण्यात येत आहे.
फलकबाजी अशी…
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोनाचे संकट होते, तरी अशा संकटकाळातही अटल सेतू, मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे काम सुरू होते आणि पुढे हे प्रकल्प पूर्ण झाले असा मुद्दा फलकबाजीच्या माध्यमातून मांडून भाजपाचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. करोनाकाळात अटल सेतू, मेट्रो, समृद्धी मार्गाचे काम सुरू ठेवणारा हाच खरा नेता, संकटकाळी मदतीला येतो तो खरा नेता अशा आशयाचे फलक शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मुंबईतील काही परिसरात लावले आहेत.