अमरावती : विधानसभा निवडणुकीत विविध प्रमुख राजकीय पक्षातील इच्‍छुकांना उमेदवारी न मिळाल्‍याने त्‍यांनी बंडाचे शस्‍त्र उगारले होते. महायुती आणि महाविकास आघाडीचे हात बंडाने पोळले होते. जिल्‍ह्यात पाच प्रमुख बंडखोर उमेदवार अपक्ष नशीब आजमावत होते. या सर्वांना मतदारांनी घरचा रस्‍ता दाखवला. पण, त्‍यांच्‍या हिमतीची चर्चा रंगली आहे.

अमरावतीत भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते जगदीश गुप्‍ता यांची बंडखोरी गाजली. महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्‍या सुलभा खोडके यांना मिळाल्‍याने जगदीश गुप्‍ता यांनी अपक्ष निवडणूक लढण्‍याचा निर्णय घेतला. महायुतीचे घटक असलेले युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांनी त्‍यांना बळ दिले. तरीही त्‍यांना विजयाच्‍या समीप पोहचला आले नाही. जगदीश गुप्‍ता यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्‍यांनी ३४ हजार ६७ मतांपर्यंत मजल मारली.

आणखी वाचा-Delhi Election 2025 : महाराष्ट्र आणि झारखंडच्या निकालांनंतर केजरीवाल सतर्क; भाजपाला शह देण्यासाठी ‘आप’चा मास्टर प्लान

बडनेरात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुनील खराटे यांच्‍या विरोधात प्रीती बंड यांनी बंडखोरी केली होती, तर युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्‍या विरोधात भाजपचे बंडखोर तुषार भारतीय यांनी दंड थोपटले होते. बडनेरात रवी राणा यांनी मोठ्या मताधिक्‍याने प्रीती बंड यांना पराभूत केले. सुनील खराटे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्‍या गेले. तुषार भारतीय हे देखील चांगली कामगिरी करू शकले नाहीत. या दुहेरी बंडाचा लाभ रवी राणांना झाल्‍याचे चित्र समोर आले.

मोर्शी मतदारसंघात वेगळेच युद्ध पहायला मिळाले. या ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत झाली, तर महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली. चौरंगी सामन्‍यात भाजपचे उमेश यावलकर यांनी बाजी मारली. राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्‍या विरोधात काँग्रेसचे नेते विक्रम ठाकरे यांनी बंडखोरी केली होती, पण त्‍यांना चौथ्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मोर्शी मतदारसंघात हर्षवर्धन देशमुख आणि नरेशचंद्र ठाकरे या दोन ज्‍येष्‍ठ नेत्‍यांमधील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. या संघर्षाचा लाभ मात्र यावेळी भाजपला मिळाला. राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आणि आमदार देवेंद्र भुयार यांना मात्र आपली जागा गमवावी लागली.

आणखी वाचा-बुलढाणा जिल्ह्यात ‘वंचित’चे ‘राजकीय उपद्रवमूल्य’ सिद्ध; बसपचे अस्तित्व संपुष्टात!

अचलपूरमध्‍ये भाजपचे प्रवीण तायडे यांच्‍या विरोधात प्रमोदसिंह गड्रेल यांनी बंडखोरी केली होती, पण त्‍यांना देखील मतदारांनी नाकारले. मेळघाटमध्‍ये भाजपच्‍या बंडखोर ज्‍योती सोळंके यांनाही मतदारांनी प्रतिसाद दिला नाही.दर्यापूरमध्‍ये महायुतीत फूट पडली होती. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले हे मैदानात उतरले होते. नवनीत राणा यांनी उघडपणे त्‍यांचा प्रचार केला, पण बुंदिले यांचा पराभव झाला. या ठिकाणी तिरंगी लढतीचा लाभ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला झाला. महाविकास आघाडीची पत या एका विजयाने राखली गेली.

Story img Loader