यवतमाळ – सात विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी जिल्ह्यात मतदान झाले. सहा मतदारसंघात यावेळी मतांचा टक्का वाढला आहे. उमरखेडमध्ये घटला आहे. अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६९.०२ टक्के मतदान झाले. वणीमध्ये सर्वाधिक ७४.८७ तर यवतमाळमध्ये सर्वात कमी ६२.४० टक्के मतदान झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ६५.७८ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात ३.२४ टक्के वाढ झाली आहे.
२०१९ मध्ये यवतमाळ मतदारसंघात केवळ ५४.१२ टक्के मतदान झाले होते. यावेळी ६२.४० टक्के मतदान झाले. यवतमाळमध्ये वाढलेली गुन्हेगारी, रखडलेली विकासकामे यामुळे नागरिकांमध्ये रोष मतपेटीत परावर्तित होईल, असा विश्वास महाविकास आघाडीला आहे. मात्र वाढलेले मतदान भाजपचेच असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये भाजप हॅटट्रिक करेल, असा दावा भाजप कार्यकर्ते करत आहेत.
हेही वाचा >>>दिग्गजांच्या मतदारंघातील वाढलेले मतदान कोणाच्या पत्थ्यावर ?
वणी मतदारसंघात २०१९ मध्ये ७२.११ टक्के मतदान झाले. यावेळी ७४.८७ टक्के मतदान झाले. वणीत यावेळी चौरंगी लढत झाली आणि मतदानही पावनेतीन टक्क्यांनी वाढले. येथे कुणबी मतांचे विभाजन झाल्याने त्याचा फायदा महायुतीला होईल, असे सांगितले जात आहे. मात्र वणीत भाजपने कुणबी समाजाचा रोष ओढवून घेतल्याने मतांची टक्केवारी वाढली व त्यामुळे येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा शिवसेना उबाठाकडून केला जात आहे.
राळेगावमध्ये २०१९ मध्ये ६९.७९ टक्के मतदान झाले. यावेळी ७३.४० टक्के मतदान झाल्याने ते महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी यावेळी एकसंघपणे निवडणूक लढवली आणि नागरिकांना मतदानासाठी बाहेर काढले. त्याचा फायदा होईल, अशी चर्चा आहे. तर भाजपने एकाकी लढत देवूनही विद्यमान आमदारांचा संपर्क व विकासकामे यावर महायुतीच्या विजयाची खात्री भाजप देत आहे.
हेही वाचा >>>मूळ प्रश्न झाकोळले, फक्त काय‘द्या’चं बोला!
राज्याचे लक्ष लागेलेल्या दिग्रस मतदारसंघात २०१९ मध्ये ६४.५५ टक्के तर यावेळी ६७ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात जातीय समीकरणे महत्वाची ठरली. येथे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत झाली. कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार ५० हजारांवर मताधिक्याने निवडून येईल, असा दावा करत आहेत. तर काँग्रेसचे कार्यकर्ते २० वर्षानंतर तुल्यबळ लढत झाल्याने विजयाची खात्री देत आहे.
आर्णीत २०१९मध्ये ६९.३९ टक्के तर यावेळी ७२.७३ टक्के मतदान झाले. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत झाली. महायुतीचे उमेदवार अनुभव आणि मतदारसंघातील संपर्काच्या जोरावर विजयाची खात्री देत आहे तर काँग्रेसमध्ये ज्येष्ठांच्या पुण्याईचा उमेदवाराला लाभ होवून विजय होईल, असा दावा करत आहे.
पुसद मतदारसंघात २०१९ मध्ये ६१.३१ टक्के ता यावेळी ६६.२७ टक्के मतदान झाले. पुसद हा बंजाराबहुल मतदारसंघ असून येथे घराणेशाहीची विजयाची परंपरा अद्याप कोणी खंडीत केली नाही. मात्र शरद पवार यांनी दिलेला उमेदवार यावेळी येथे महायुतीच्या उमदेवाराची घराणेशाहीची परंपरा मोडीत काढेल, असा विश्वास महाविकास आघाडीत व्यक्त् होत आहे.
उमरखेड मतदारसंघात २०१९मध्ये ६९.१६ टक्के तर यावेळी ६८.७५ टक्के मतदान झाले. यावेळी या मतदारसंघात मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे कमी झालेली मते भाजपची असल्याचा दावा विरोधक करत आहेत. उमरखेडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीनेही दिलेला उमेदवार नवखा आहे. त्यातच दोन माजी आमदारही बंडखोरी करून रिंगणात होते. त्यामुळे येथील निकालातही बंडखोरीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.