कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. दोन्हीकडे तीन – तीन पक्ष असल्याने मनाप्रमाणे जागावाटप होत नसल्याने बंडाचे झेंडे अटळ बनले आहेत. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दुभंग झाल्यानंतर जागा वाटपावेळी कोणती शिवसेना – राष्ट्रवादी प्रमाण मानायची याला काहीच आधार नसल्याने हा मुद्दा कळीचा मुद्दा बनला आहे. दोन्ही पक्ष पूर्व इतिहास कथन करीत जागांवर दावा केला जात असल्याने पेच सोडवण्यात अडचणी येत आहेत.
जिल्ह्यातील दहा मतदारसंघात महायुती आणि माविआच्या नेत्यांना जागावाटपावेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांमध्ये दुभंग झाला असल्याने गुंता वाढला आहे. महायुती आणि मविआशी जागा वाटप करताना शिवसेना तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट पूर्वी येथून निवडणूक लढवल्याचा इतिहास सांगत तो आपल्याकडे येणे कसे रास्त आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातील कोणती शिवसेना – राष्ट्रवादी प्रमाण मानायची याला साधार नसल्याने भाजप आणि काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. शिवाय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांना चर्चेवळी असा प्रश्न करणेही त्यांच्या दृष्टीने अडचणीचे बनत चालले असून हा तोंड दाबून मार सहन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
हेही वाचा – बांगर यांना निवडणूक विभागाची नोटीस; ‘फोनपे’वरील विधानावरील वाद
अनुत्तरीत उत्तर
कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या आठपैकी पाच लढतीत शिवसेनेने तर तीन वेळा काँग्रेसने विजय मिळवला आहे. साहजिकच येथे शिवसेनेने पूर्व इतिहास सांगत तो सेनेकडे राहिला पाहिजे असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय पवारसह अर्ध्या डझन उमेदवारांनी हेच कथन करीत आपलाही दावा प्रबळ केला आहे. परिणामी येथे भाजप आणि काँग्रेस या दोघांचीही कोंडी झाली आहे. पूर्वी निवडणूक लढवल्याचा संदर्भ देत शिंदेसेनेने कोल्हापूर दक्षिणवर हक्क सांगितला होता पण भाजपने तो अमान्य करीत आपल्याकडे ठेवल्याने येथील वाद वेळीच रोखला गेला आहे.
लोकसभेची साक्ष
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी- शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. तथापि या दोन्ही पक्षात फूट पडल्याने नेमक्या कोणत्या शिवसेना – राष्ट्रवादी गटाकडे ही जागा होती, असे विचारणेही अवघड होऊन बसले आहे. खेरीज, लोकसभेला केलेला त्याग आठवून मनाचे मोठेपण दाखवून काँग्रेसने उत्तर मतदारसंघ आमच्याकडे सोपावावा या गृहीतकावर ठाकरे शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली असल्याने याचे उत्तर शोधताना काँग्रेसला शीर्षासन करावे लागत आहे.
हेही वाचा – बाहेरच्या मतदारांना ‘बांग’र
चंदगडी तिढा
चंदगडमध्ये असेच त्रांगडे निर्माण झाले आहे. या भागात पूर्वी राष्ट्रवादीने निवडणूक लढवली असल्याचा मुद्दा पुढे करीत शरद पवार राष्ट्रवादीच्या नंदा बाबुळकर (विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या ) यांनी उमेदवारी मागितली आहे. ठाकरे शिवसेनेच्या तिघांनी पूर्वपरंपरेचा हक्क सांगत प्रतिदावा चालवला आहे. येथेही कोणत्या पक्षाच्या पूर्वपरंपरेचा धागा पकडून पुढे जायचे याचा गुंता निर्माण झाला आहे.