भंडारा : मागील २५ वर्षांपासून साकोली मतदारसंघावर घट्ट पकड असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा येथे झालेला ‘लाजिरवाणा विजय’ त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा ठरला आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक वगळता कुठल्याही पक्षात असो वा स्वतंत्र लढलेले असो, पटोले कधीच हरले नाहीत. या निवडणुकीतही ते जिंकले, मात्र काठावर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साकोली तालुक्यातील सुकळी या छोट्याशा गावातल्या नानांनी राजकारणात गल्ली ते दिल्ली, अशी उत्तुंग झेप घेतली. पटोलेंना त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून लढत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. मागील पाच निवडणुका ते या मतदारसंघातून लढले आणि जिंकलेसुद्धा.

हेही वाचा – देवतळे कुटुंबाची धानोरकर कुटुंबावर मात; ७० वर्षांनंतर वरोऱ्यात कमळ फुलले

साकोली मतदारसंघ नानांची जन्मभूमीच नाही तर कर्मभूमी देखील आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असलेल्या नानांनी मागील २५ वर्षांत येथील शेतकऱ्यांसाठी काय केले, विकासाची कोणती कामे केलीत, बेरोजगारांसाठी काय केले, क्षेत्रात कोणते नवे उद्योग आणले, या सर्व प्रश्नांभोवती ही निवडणूक लढली गेली आणि त्याचीच परिणती निकालात झाली. प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत भाजपमध्ये असलेली नाराजी नानांच्या फायद्याची ठरेल, असे अंदाज वर्तवले जात होते. त्यामुळे नानाही गाफील राहिले. सुदैवाने भाजपची मते विभाजित झाली आणि टपाल मते देवदुतासमान धावून आलीत. नाना काठावर विजयी झालेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे नानांचा आत्मविश्वास बळावला. मात्र हाच आत्मविश्वास अतिआत्मविश्वासात परावर्तित झाला. नानांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. भंडारा विधानसभा मतदारसंघातही त्यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर धुरा सोपवली होती. यामुळे तेथेही नानांचा घात झाला. काँग्रेसच्याच काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तेथे महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांचा प्रचार केला. यामुळे नाना तोंडघशी पडले.

हेही वाचा – काँग्रेसच्या गडाला भाजपने सुरूंग कसा लावला?  

अवघ्या २०८ मतांनी विजयी झालेल्या नानांना आता आत्मचिंतनाची गरज असून ‘केवळ गोड बोलून आणि खांद्यावर हात ठेवून विजय संपादन करता येतो,’ या त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election results sakoli constituency nana patole victory print politics news ssb