छत्रपती संभाजीनगर : Muslim Dalit and Maratha Vote in Chhatrapati Sambhaji Nagar प्रक्षोभक भाषणामुळे दहा वर्षापूर्वीपासून प्रसिद्धी झोतात असणाऱ्या अकबरोद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ‘ मुस्लिम- दलित आणि मराठा’ ही मतपेढी पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगत प्रतिमा मवाळ करण्याचा प्रयत्न औरंगाबाद येथील सभेतून केला. महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाकडे आता विचारसरणी राहिलेली नाही मग आम्हीच कसे जातीयवादी, असा सवालही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे कॉग्रेसबरोबर गेले, त्यांनी कॉग्रेसला हिंदूत्त्व शिकवले की, कॉग्रेसने शिवसेनेला धर्मनिरपेक्षता शिकवली , अजित पवार महायुतीबरोबर गेले त्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार शिकवला की भाजपने त्यांना हिंदूत्त्व शिकवले, असे प्रश्न उपस्थित करत अकबरोद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रात आता कोणतीच विचारसरणी शिल्लक नाही, असे म्हटले. दुबळया आणि मुस्लिमांचा आवाज असणारी ‘एमआयएम’ हाच पक्ष जातीयवादी कसा, असा प्रश्न अकबरोद्दीन ओवेसी यांनी केला.
हेही वाचा >>> निवडणूक उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्यच; आयोगाचा उच्च न्यायालयात दावा, याचिका फेटाळली
आम्ही दुबळ्यांचा आवाज बनतो, त्यांचे प्रश्न मांडतो. ते माध्यमांना नको असतात, त्यामुळे आम्ही प्रक्षोभक आणि जातीयवादी ठरतो, असा युक्तीवादही त्यांनी भाषणातून केला. बेरोजगारी, महागाई , प्रादेशिक मागासलेपण यावरही अकबरोद्दीन यांनी मते मांडली. तब्बल दहा वर्षांच्या खंडानंतर अकबरोद्दीन ओवेसी यांचे भाषण झाल्याने शहरातील आमखास मैदानात मोठी गर्दी झाली होती. दहा वर्षापूर्वी इम्तियाज जलील किंवा वारीस पाठण यांच्यासारखे नेतृत्व महाराष्ट्रात नव्हते. तेव्हा नेतृत्व उभे करण्यासाठी आलो होतो आता नेतृत्वास बळ देण्यासाठी आलो असल्याचे अकबरोद्दीन म्हणाले. मुस्लिमही मराठा आणि दलित ही मतपेढी आवश्यक आहे.
हेही वाचा >>> महायुतीतील बंडखोरांवर कारवाईची केवळ घोषणाच! भाजपकडूनही हकालपट्टीचा निर्णय प्रलंबित
या भागातील प्रत्येक व्यक्तीच मराठा आहे. त्यामुळे पुढील काळात मराठा – मुस्लिम व दलितांनी एकत्र येण्याची गरज आहे. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेला आम्ही साथ देऊ असेही अकबरोद्दीन म्हणाले. प्रक्षोभक भाषणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अकबरोद्दीन यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून मुस्लिम मतांची बेगमी करण्याची राजकीय खेळी ‘ एमआयएम’ आखली आहे. अकबरोद्दीन यांनी ‘ एमआयएम’ मुस्लिम हिताचा पक्ष असला तरी पक्षाची भूमिका सर्व जातीच्या विरोधात अन्याय रोखणारी असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.