अकोला : लोकसभा निवडणुकीतील मतांच्या गणिताचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर देखील होण्याची दाट शक्यता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात महायुती विधानसभेच्या चार, तर मविआ दोन मतदारसंघात वरचढ ठरली होती. आता तेच समीकरण कायम राखण्याचे पक्षांपुढे लक्ष्य राहील. वंचितकडून चित्र बदलवण्याचे प्रयत्न आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत अकोला मतदारसंघांतील विधानसभेच्या पाच जागांवर भाजप व काँग्रेसमध्ये तीव्र चुरस झाली, तर अकोला पूर्व मतदारसंघात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये मतांसाठी चढाओढ दिसून आली. लोकसभेमध्ये अकोला पूर्व मतदारसंघात भाजपने तब्बल २७ हजार ४७७ मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. वंचित आघाडीने दुसऱ्या क्रमांकाची ६० हजार ३३४ मते मिळवली, तर काँग्रेसला ५० हजार ८७८ मते मिळाली होती. अकोला पूर्व मतदारसंघातील आघाडी लोकसभेतील भाजपच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. अकोला पूर्व मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१४ पासून येथे मोठ्या प्रमाणात भाजपला जनाधार मिळाला. भाजपकडून पुन्हा एकदा रणधीर सावरकर रिंगणात आहेत. लोकसभेतील समीकरण त्यांच्यासाठी पोषक ठरू शकते. शिवसेना ठाकरे गट व वंचितपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. लोकसभेत अकोटमध्ये भाजपला ७८ हजार २२८, तर काँग्रेसला ६९ हजार ०६० मते मिळाली. आता देखील अकोटमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये सामना रंगत आहे. बाळापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत नऊ हजार ८४४ मतांनी काँग्रेसने आघाडी घेतली होती. विधानसभेत हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला सुटला आहे. बाळापूरमध्ये दोन्ही शिवसेनेसह वंचित आघाडी अशी तिहेरी लढत होत आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटापुढे लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचे, तर शिवसेना शिंदे गट व वंचितपुढे मतांचा टक्का वाढवण्याचे लक्ष्य आहे. अकोला पश्चिम मतदारसंघा चूरस आहे. लोकसभेत काँग्रेसने १२ हजार ०७१ मतांनी आघाडी घेतली असली तरी त्यावेळी काँग्रेसचे डॉ. अभय पाटील उमेदवार होते. आता काँग्रेसकडून साजिद खान पठाण उमेदवार आहेत. अकोला पश्चिममधील लढतीला धार्मिक रंग चढले आहेत. या ठिकाणी भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण आणि वंचित समर्थित अपक्ष हरीश आलिमचंदानी यांच्यात लढत आहे. मतविभाजनाचे गणित महत्त्वपूर्ण ठरेल. मूर्तिजापूरमध्ये भाजपला लोकसभेत आठ हजार १४७ मतांची आघाडी होती. ती कायम राखण्याची भाजपची आता धडपड सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील लढतींचे स्वरूप बदलले असले तरी मतविभाजन व जातीय राजकारणाचे तेच समीकरण कायम राहण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : अमरावती जिल्ह्यात उपद्रवमूल्य वाढविणारा प्रयोग
रिसोडमध्ये मोठे बदल
अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपने लोकसभा निवडणुकीत आठ हजार ०८२ मतांनी आघाडी घेतली होती. त्यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आता तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यातच या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट लढत असल्याने महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. त्यामुळे रिसोडमध्ये लोकसभेचे समीकरण विधानसभेत लागू होणार नसल्याचे चित्र आहे.