महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून शेवटच्या क्षणापर्यंत घोळ झाला. कोण किती जागा लढविणार हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हते. लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आणि जागावाटप लवकर जाहीर करू, असे संजय राऊत यांनी जाहीर केले होते. तर दोन महिन्यांपूर्वी महायुतीचे ९० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. राऊत किंवा बावनकुळे दोघांनी काहीही दावा केला तरीही जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत मिटला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत तरी हा घोळ मिटतो का याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडी व महायुतीतील प्रत्येकी तीन अशा सहा पक्षांमध्ये सर्वाधिक १५२ जागा भाजपच्या वाट्याला आल्या. काँग्रेसची १०० जागा मिळाव्यात ही मागणी अखेर पूर्ण झाली. शिवसेना ठाकरे गटाला ९६ तर शिवसेना शिंदे गटाला ८० जागा मिळाल्या. शिंदे यांच्यापेक्षा किमान दहा जागा तरी अधिक मिळाल्या पाहिजे ही उद्धव ठाकरे यांची मागणी मान्य झाली.

हेही वाचा :परभणीत ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध, जिल्ह्यातल्या चार मतदारसंघात १९२ अर्ज पात्र

राष्ट्रवादीत शरद पवारांच्या वाट्याला ८७ तर अजित पवारांना ५२ जागा मिळाल्या. फुटीनंतर शिवसेना व राष्ट्रवादीत कोणता गट सरस ठरणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : नाराजांची समजूत घालण्याचा भाजपकडून प्रयत्न, काँग्रेसमध्ये श्रेष्ठींकडे लक्ष

सहा प्रमुख पक्षांमध्ये सर्वाधिक जागा लढणारा भाजप हा निकालानंतर मोठा भाऊ ठरणार का? लोकसभेत सर्वाधिक जागा लढणाऱ्या भाजपची पिछेहाट झाली होती. यामुळेच लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होणार की समीकरणे बदलणार, याचाही उत्सुकता आहे.