मुंबई : राज्यात एकेकाळी २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाची तब्बल २१ जिल्ह्यांमध्ये पाटी कोरी राहिली आहे. काँग्रेसची ही निच्चांकी आमदारांची संख्या आहे.
काँग्रेसचे फक्त १६ आमदार निवडून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, नसिम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. सहा महिन्यांर्पू्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक १३ खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण पक्षाची निचांकी कामगिरी झाली आहे. १९७०, १९८०च्या दशकात काँग्रेसचे राज्य विधानसभेत २०० पेक्षा अधिक आमदार निवडून येत असत. काँग्रेसची घट्ट पकड होती, पण हळूहळू काँग्रेसची ताकद कमी होत गेली.
या जिल्ह्याचा पक्षाचा एकही आमदार नाही
धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही.
महत्त्वाच्या जिल्ह्यांत अपयश
पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला नेहमी यश मिळत असे. पुणे जिल्ह्यात पक्षाला भोपळा फोडता आला नाही. सोलापूर जिल्ह्यातही काँगेसची पाटी कोरी राहिली. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसला.