नागपूर : काँग्रेसतर्फे सलग तीन वेळा आमदार आणि अनेक वर्षे राज्याचे मंत्रीपद भूषवलेले अनीस अहमद वंचित बहुजन आघाडीतर्फे मध्य नागपुरातून निवडणूक लढणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून लांब होते. मधल्या काळात त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. आता त्यांच्या उमेदवारीमुळे मध्य नागपूरमध्ये मुस्लीम मतांच्या विभाजनाची शक्यता असून त्याचा फायदा भाजपला मिळेल. त्यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का
u
मध्य नागपूर हा मुस्लीम व हलबाबहुल मतदारसंघ आहे. मागील पंधरा वर्षांपासून भाजपने हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी दिली. यंदाही ते स्पर्धेत होते. पण, यावेळी भाजपने गैरहलबा प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे काँग्रेसकडून मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी खुद्द अनीस अहमद यांनी केली होती. मात्र काँग्रेसने मागच्या निवडणुकीत अल्पमताने पराभूत झालेल्या बंटी शेळके यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी दिल्याने अनिस यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हाच ते बंड करणार, असे संकेत मिळाले होते.