भंडारा : भंडारा विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसच्या पूजा ठवकर, शिंदेसेनेचे नरेंद्र भोंडेकर आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार असला तरी अपक्ष उमेदवारांचेही त्यांच्यासमोर आव्हान आहे.
शिवसेना शिंदे गटाने तीव्र विरोध असतानाही महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली खदखद कायम आहे, तर आघाडीच्या उमेदवार पूजा ठवकर यांच्या उमेदवारीवरून स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. युती आणि आघाडीत उमेदवारीवरून सुरू असलेल्या या नाराजीनाट्यामुळे अपक्षांचे मात्र ‘चांग भलं’ होत आहे. सध्या सर्वच पक्षातील असंतुष्ट एकवटले असून अपक्ष उमेदवारांचे हात बळकट करण्यासाठी सरसावले आहेत. कुणी छुप्या पद्धतीने तर कुणी उघडपणे अपक्ष उमेदवाराना समर्थन देत आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा >>>वंचितच्या भूमिकेमुळे ‘अकोला पश्चिम’चे समीकरण बदलणार
येथे ठाकरे गटाचे बंडखोर नेते नरेंद्र पहाडे, काँग्रेसचे बंडखोर नेते प्रेमसागर गणवीर यांच्यासह देवांगणा गाढवे या अपक्ष उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांना चांगलाच घाम फोडला आहे. गाढवे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक बसपकडून लढविली होती, त्यावेळी त्यांना ४२ हजार ५७६ मते मिळाली होती. शिवसेनेचे आमदार असलेले भोंडेकर तेव्हा तिसऱ्या स्थानी होते. त्यावेळी आमदारकीची माळ भाजपचे रामचंद्र अवसरे यांच्या गळ्यात पडली होती.
या निवडणुकीत गाढवे अपक्ष असल्या तरी पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरल्या आहेत. त्यातच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गणवीर यांनीही बंडखोरी करत ठवकर यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आणि थेट नाना पटोलेंना आव्हान दिले. यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.पहाडे यांची अपक्ष उमेदवारी युतीसह आघाडीच्या उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. पहाडे अपक्ष असले तरी त्यांना सर्वपक्षीय पाठबळ मिळत असल्याने या निवडणुकीत ते ‘गेमचेंजर’ ठरू शकतात.
हेही वाचा >>>महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
महायुती आणि महाविकास आघाडीतील या नाराजीनाट्यामुळेच भंडारा विधानसभेची समीकरणे बदलतील, अशी चिन्हे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचेही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते पहाडे यांना छुपी मदत करीत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एका भाजप नेत्याने सांगितले. याशिवाय परमात्मा एक सेवकचे दुखावलेले अनुयायी पहाडे यांच्या बाजूने असून यामुळे भोंडेकर यांची झोप उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला महायुतीतील मोठ्या नेत्यांची अनुपस्थिति
भोंडेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ७ नोव्हेंबरला पवनी येथे प्रचार सभा झाली. मात्र, महायुतीचा जिल्ह्यातील एकही मोठा नेता सभेच्या व्यासपीठावर दिसला नाही. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.