मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) दुसऱ्या यादीत २२ उमेदवारांच्या यादीत पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी, अजित पवार गटातून पक्षात प्रवेश केलेले सतीश चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची कन्या नंदिनी यांना स्थान देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे या मराठा समाजाच्या उमेदवाराला रिंगणात उतरवून जातीच्या ध्रुवीकरणावर भर देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत घराणेशाहीवर भर देण्यात आला आहे. गंगापूर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चव्हाण हे निवडणूक लढण्यासाठी अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सामील झाले आहेत. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘हजारी कार्यकर्ता’ यंत्रणा मोडीत?

अजित पवार यांचे भाचे राहुल मोटे यांना परांडामधून उमेदवारी देण्यात आली आहे. मोटे यांनी निवडणूक लढण्याच्या उद्देशानेच अजित पवार गटात प्रवेश केला नव्हता. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची कन्या नंदिनी कुपेकर, अहमदनगरमध्ये अभिषेक कळमकर आदी उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे.

छगन भुजबळ यांना शह देण्याकरिता शरद पवार गटाने मराठा समाजातील माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मराठा-ओबीसी असे जातीचे ध्रुवीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या पहिल्या यादीत ४५ उमेदवारांच्या नावांचा घोषणा करण्यात आली होती. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राष्ट्रवादीचे ६७ उमेदवार जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादीला ‘मविआ’तील जागावाटपात ९० जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तिसरी यादी उद्या जाहीर होईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगतिले.

हेही वाचा : सोलापुरात जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, जिल्ह्यातील चार मतदारसंघांत संघर्ष

२२ उमेदवार

एरंडोल (सतीश पाटील), गंगापूर (सतीश चव्हाण ), शहापूर (पांडुरंग बरोरा), परांडा (राहुल मोटे), बीड (संदीप क्षीरसागर), आर्वी (मयुरा काळे), बागलाण (दीपिका चव्हाण ), येवला (माणिकराव शिंदे), सिन्नर (उदय सांगळे), दिंडोरी (सुनीता चारोस्कर ), नाशिक पूर्व (गणेश गीते), उल्हासनगर (ओमी कलानी), जुन्नर (सत्यशील शेरकर), पिंपरी (सुलक्षणा शिलवंत), खडकवासला (सचिन दोडके), पर्वती (अश्विनी कदम), अकोले (अमित भांगरे), अहमदनगर शहर (अभिषेक कळमकर), माळशिरस (उत्तमराव जानकर), फलटण (दीपक चव्हाण), चंदगड (नंदिनी भाबुळकर- कुपेकर), इचलकरंजी (मदन कारंडे) यांचा समावेश आहे.